रेल्वे महाभरती

<<संजय मोरे>>

हिंदुस्थानी रेल्वेच्या इतिहासात कदाचित प्रथमच जवळपास लाखभर पदांची टेक्निकल व ग्रुप ‘डी’ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर भरती कोणत्याही क्षेत्रात आतापर्यंत झालेली नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. त्यात ग्रुप ‘डी’च्या प्रथमतः साधारणपणे ६२ हजारांपेक्षा जास्त जागा प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्यात आणखी भर पडली आणि ग्रुप ‘डी’ पदासाठी ९० हजारांपेक्षा जास्त जागा प्रसिद्ध झाल्या आहेत.

स्पर्धेच्या या युगात ‘अभ्यास’ ही एक गोष्ट तुमचं नशीब चांगल्या प्रकारे घडवू शकते. अभ्यासाला जोड हवी ती मेहनत, चिकाटी, जिद्द आणि महत्त्वाकांक्षेची संस्कृतमध्येही म्हटले आहे – ‘दैवंच अत्र पंचतत्रम्’ म्हणजेच दैवाचा क्रमांक पाचवा लागतो. त्याआधी, मेहनत, चिकाटी, जिद्द आणि महत्त्वाकांक्षा हे गुण महत्त्वाचे आहेत. याबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये हवाय ‘संयम’ हा गुण. कदाचित पहिल्या प्रयत्नात यश मिळणार नाही म्हणून खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने तयारीला लागायला हवे. आता तर रेल्वेमध्ये मोठय़ा प्रमाणावर भरती निघाल्यामुळे उमेदवारांमध्ये नोकरीसाठी म्हणजे नोकरी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू होताना दिसेल. नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेतील भरतीचा निकाल जाहीर झाला असून उमेदवारांनी उत्तमोत्तम गुण मिळविलेले बघायला मिळाले आहेत. स्पर्धा परीक्षेशिवाय नोकरी नाही हे ज्यांना समजलेले आहे व स्पर्धा परीक्षांची योग्य तयारी जे करीत आहेत त्यांना आपले भवितव्य या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करता येणार आहे.

टेक्निकल पदांसाठी एकूण दोन म्हणजेच पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा असे स्वरूप असेल तर ग्रुड ‘डी’ पदासाठी फक्त एकच परीक्षा असेल व त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल.

पूर्वपरीक्षेसाठी गणित, बुद्धिमत्ता चाचणी, जनरल अवेअरनेस व सायन्स असे विषय आहेत.

गणित १ या घटकात संख्या व संख्या प्रणाली, मसावि व लसावि, पदावली, शतमान – शेकडेवारी, नफा-तोटा, त्रिकोणमिती, सरासरी, गुणोत्तर – प्रमाण, भागीदारी, मिश्रणावरील उदाहरणे, भूमिका, घनफळ व क्षेत्रफळ, काळ-काम, अंतर-वेग व वेळ, सरळव्याज व चक्रवाढव्याज यांचा समावेश होतो.

बुद्धिमापन चाचणी यात संख्यामालिका, वर्णमालिका, समान-संबंध, वर्गीकरण, विसंगत घटक, सांकेतिक भाषा, दिशाविषयक प्रश्न, नाते – संबंध, अक्षरांची/ अंकांची लयबद्ध रचना, तुलनात्मक प्रश्न, घड्याळ व कालमापन यावरील प्रश्न.

सामान्य विज्ञान या घटकात साधारणपणे दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या घटकांचा समावेश केलेला असतो. याशिवाय, जनरल अवेअरनेस या घटकांत चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र या घटकांचा समावेश होतो. यात १८५७ पासूनचा इतिहास विचारला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुस्थानातील ठळक घडामोडी, क्रांतिकारकांची कार्ये व घटना, समाजसुधारकांचे कार्य, लेखन, महत्त्वाची वृत्तपत्रे अशा घटकांचा समावेश होतो. भूगोल या घटकात पृथ्वी व जग, जगातील विभाग, अशांश व रेखांश, भौगोलिक स्थळे, नद्या व उपनद्या, नदीकाठची शहरे. अशा प्रकारचा परीक्षेचा अभ्यासक्रम असून साधारणपणे दोन महिन्यांनंतर ही परीक्षा होणार आहे. कठोर परिश्रमाबरोबरच अभ्यासाचे तंत्रदेखील महत्त्वाचे आहे. गणितातील शॉर्टकटस् हादेखील एक तंत्राचाच भाग म्हणायला हवा. वेळेचे नियोजन करून अभ्यास करणे आवश्यक आहे. कठोर परिश्रमाला अभ्यासाच्या तंत्राची जोड महत्त्वाची आहे. हे युग स्पर्धेचे, ज्ञानाचे, संगणकाचे आहे. म्हणूनच सखोल अभ्यास तुम्हाला ज्ञानी बनविणार आहे आणि त्यामुळे स्पर्धा जिंकणे सोपे होणार आहे हे लक्षात ठेवा.

परीक्षेची व्यवस्थित तयारी करणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेत यश मिळवणे अवघड होणार नाही. त्यामुळे अभ्यासात एकाग्रता साधा यशातून यशाला नवीन मार्ग मिळतो. तुमची कृती, तुमचे यश अधिक बोलके असते. त्यामुळे यश मिळवण्यासाठी तयार रहा.