संजय निरुपम यांच्या समर्थकांची पत्रकारांना धक्काबुक्की

44

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यावर संजय निरुपम यांच्या समर्थकांचा मानसिक तोल ढळला असून निरुपम यांच्या हकालपट्टीचा राग आज त्यांच्या समर्थकांनी पत्रकारांवर काढला. निरुपम यांना अडचणीचा प्रश्न विचारल्याच्या मुद्दय़ावरून निरुपम यांचे समर्थक पत्रकारांच्या अंगावर धावून गेले आणि टीव्ही चॅनेलच्या पत्रकारांना धक्काबुक्की केली.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर संजय निरुपम यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. निरुपम यांना काँग्रेसने उत्तर-पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. निरुपम यांनी त्यांच्या उत्तर मुंबईतून निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. तुम्ही उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक का लढवण्यास तयार झाला नाहीत, असा प्रश्न टीव्ही चॅनेलच्या एका प्रतिनिधीने विचारला त्यावर निरुपम यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. पण तरीही चॅनेलच्या पत्रकाराने प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला तेव्हा निरुपम समर्थक आक्रमक झाले आणि चॅनेलच्या पत्रकाराच्या अंगावर धावून गेले आणि धक्काबुक्की केली. निरुपम यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण या प्रकारामुळे पत्रकार संतप्त झाले होते.

आता तरी गटबाजी संपेल
दरम्यान, या पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम यांच्या मनातील खदखद बाहेर पडली. मला हटवल्यानंतर आता तरी मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपेल. आता तरी हायकमांडकडे तक्रारी कमी होतील, असा टोला त्यांनी त्यांच्या विरोधकांना मारला. त्यावेळी त्यांनी मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद देवरा यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबई अध्यक्ष नसलो तरी माझी आंदोलने सुरू राहतील असेही ते सांगण्यास विसरले नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या