संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद हे दुर्दैव; लढा सुरूच राहणार; वाघबाईंच्या संतापाचा कडेलोट

संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या. राठोड यांचा थेट एकेरी उल्लेख करीत त्यांनी राठोडांबरोबरच्या संघर्षाचा दुसरा अंक सुरू केला आहे. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ म्हणाल्या, ‘राठोड पुन्हा मंत्री झाला असला तरी त्याच्याविरुद्ध माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. लडेंगे और जितेंगे भी.’ चित्रा वाघ एवढय़ावरच थांबलेल्या नाहीत तर राठोडांना मंत्रिमंडळातून दूर केले नाही, तर भाजपचा राजीनामा देण्याचीही तयारी केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड वनमंत्री होते. टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर राठोड यांच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चित्रा वाघ यांनी आकाशपाताळ एक केले होते. त्याच राठोड यांच्या मांडीला मांडी लावून आता या नेत्यांना बसावे लागणार म्हणून चित्रा वाघ संतापल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी राजीनामा द्यावा

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील आरोपी असणारे आमदार संजय राठोड यांच्याविरोधात भाजपने रान पेटवले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर राठोड यांना चपलेने मारण्याची भाषा केली होती. त्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला. संजय राठोड यांना आता मंत्रिमंडळात सामील करून घेणे चमत्कारिक आहे. भाजपकडे कोणती लाँड्री आहे? भाजपात एखादा नेता लाँड्रीच्या बाहेर आला की तो स्वच्छ दिसायला लागतो, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. चित्रा वाघ यांना ही लढाई लढायची असेल तर त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून भाजपाच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

तेव्हा बडबड करणारे पोपट कुठे गेले?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता त्याच राठोड यांना पुन्हा मंत्री करण्यात आले आहे. त्या वेळी भाजपानेही रान उठवले होते. चित्रा वाघ यांनी तर आकाशपाताळ एक केले होते. मात्र आता राठोड यांना मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे तेव्हा बडबड करणारे पोपट आता कुठे गेले, असा खोचक टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला. भाजपमध्ये ज्या दोन-तीन महिला आहेत त्यापैकी एकही मंत्रीपदासाठी लायक नाहीत का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आम्ही किती संवेदनशील आहोत, याचे एक चित्र निर्माण केले गेले होते. मात्र आता तो भोपळा फुटला आहे, अशी टीका पेडणकर यांनी केली आहे.

आधी आरोप करणाऱ्या भाजपमुळेच राठोडांना मंत्रीपद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरून चिमटा काढला आहे. त्या म्हणाल्या की, पूजा चव्हाण प्रकरणात आरोप असलेल्या संजय राठोडांना मंत्रीपद दिल्याचा आनंद आहे. भाजपमुळेच संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, पण आता भाजपमुळेच राठोडांना मंत्रीपद मिळाले. त्यामुळे मला आनंद होतोय!