संजय राठोडची आरती करा आता! पूजा चव्हाणच्या आजीचा संताप

मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड यांना स्थान दिल्याच्या मुद्दय़ावरून पूजा चव्हाण हिच्या आजीने नाराजी व्यक्त केली आहे. या सरकारने संजय राठोडची आता आरती करावी म्हणजे त्यांना चांगलं वाटेल, अशा शब्दांमध्ये तीव्र संताप पूजाच्या आजी शांताबाई राठोड यांनी व्यक्त केला आहे.

पूजाच्या आत्महत्येनंतर तिला न्याय मिळेल, अशी अपेक्षा या सरकारकडून होती. मात्र, मंत्रिमंडळाचा जो शपथविधी झाला तो पाहून असं वाटत नाही. संजय राठोडला मंत्री म्हणून स्थान दिलं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नसल्याचे शांताबाई राठोड म्हणाल्या.

पोलीस क्लीन चिट देऊ शकतात, पण जनता नाही

महिलांना 50 टक्के आरक्षण असून पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही. पोलीस तुमचे आहेत. ते क्लीन चिट देऊ शकतात, पण जनता देणार नाही. तो गुन्हेगार आहे आणि शेवटपर्यंत गुन्हेगार राहणार. तो खुनी आहे, खुनीच राहणार, असा संताप शांताबाई राठोड यांनी व्यक्त केला.