माजी आमदार आणि नुकतेच काँग्रेस सोडून अजित पवार गटात सामील झालेल्या बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी हे अनेक वर्ष आमदार होते. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. एका कार्यक्रमातून बाहेर पडताना मारेकऱ्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. मुंबईत सुरू असलेल्या हत्यांचे सत्र आता राजकीत नेते, माजी मंत्री, आमदारापर्यंत पोहोचले आहे. या राज्यात सुरक्षित आहे तरी कोण हे अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावे. सामान्य जनता, महिला, व्यापारी-उद्योगपती, राजकीय कार्यकर्ते, नेते, माजी मंत्री-आमदार सुरक्षित नाहीत. मग गृहखाते काय करतेय? असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री हरियाणात निवडणूक जिंकली म्हणून इथे पेढे वाटतात. पेढे खा, पण राज्यात जनतेसमोर दिवसाढवळ्या रक्तपात, हिंसाचार, दहशत, खंडणीसत्र सुरू आहे. अशावेळी राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की नाही? महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात अपयशी, निष्क्रिय असे हे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. पण आता गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा असे सांगण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आणि आता काय झालेत… त्यांचे अध:पतन आमच्या डोळ्यासमोर झाले. विरोधकांच्या बाबतीत काड्या करण्यापेक्षा, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा गृहमंत्रीपदाच्या जबाबदारीला आणि पदाला कर्तव्यभावनेने जागून काम करा, असे आवाहन राऊत यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, कालची घटना अत्यंत भयंकर आणि दुर्दैवी आहे. आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांची पूर्ण सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे. त्याची आम्हाला चिंता नाही. हे सूड बुद्धीचे राजकारण आहे. पण बाबा सिद्दिकी महायुतीमध्ये सामील असताना आणि वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असतानाही त्यांना मारण्यात आले. मुंबईत भर वस्तीमध्ये हत्या झाली याच्यावरती गृहमंत्र्यांनी खुलासे करत बसू नये. त्यांना जर स्वत:ला या संदर्भात काही खंत, खेद वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावाच नाही तर राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मागावा.
मुंबई सारख्या शहरातील पोलीस दलामध्ये एकनाथ शिंदे यांच्या टोळीतील लोकांची भरती करण्यात आली. जिथे आयपीएस दर्जाच्या पोलिसांची नेमणूक होणे आवश्यक आहे, तिथे एकनाथ शिंदे यांच्या बॅगा उचलणारे, हुजरेगिरी करणारे, शिंदेंचे शूटर म्हणून काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणले आहे. मुंबई पोलीस दलात पोलीस अधिक्षकांपासून ते डीवायएसपींपर्यंत नेमणुकांसाठी टेंडर निघालेले आहे. ही टेंडर वर्षा बंगल्यावरून किंवा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून भरली जातात. पोलिसांच्या नेमणुकांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. पोलिसांचा राजकीय फायद्यासाठी, खंडण्या गोळा करण्यासाठी वापर केला जातोय. त्याच्यामुळे अशा हत्या होणारच, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.
राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महाराष्ट्राला लाभलेले तीन तीन सिंघम दिवसाढवळ्या हत्या, बलात्कार होत असताना कुठे असतात? एका अक्षय शिंदेला तुम्ही मारलेत, आणि स्वत:ला सिंघम घोषित केले. आता तुम्हाला राष्ट्रपतींनी परमवीरचक्र द्यावे का? एकनाथ शिंदे गुंड, टोळी, गँग चालवावी त्या पद्धतीने पोलीस खाते चालवत असून गृहमंत्री अत्यंत हतबल आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी मंत्रीमंडळात राहू नये आणि गृहखातेही सांभाळू नये, असेही राऊत म्हणाले.
Baba Siddique shot dead – बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया