जामिनाची व्यवस्था करूनच जयदीप आपटेला अटक; ठाण्यातून सूत्र हलली, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला शिल्पकार जयदीप आपटे याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. मात्र आपटेला अटक होण्याआधीच सिंधुदुर्गाच्या कोर्टामध्ये त्याच्या जामिनाची तयारी गेल्या 8 दिवसांपासून सुरू असून त्यासाठी ठाण्यातून सूत्र हलताहेत, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

गुरुवारी सकाळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, जयदीप आपटे दोन दिवसांमध्ये सरेंडर होईल, ताबडतोब त्याच्या जामिनाची व्यवस्था करा, अशी सूत्र ठाण्यातून हलत आहेत. त्यासाठी कायदेशीर मदतही ठाण्यातून केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यात हा बाजार मांडला आहे आणि जे षडयंत्र रचण्यात आले आहे, त्याचे सर्व सूत्रधार ठाण्यातच आहेत.

जयदीप आपटे याच्या मागे महाशक्ती असल्याने तो इतके दिवस पोलिसांना चुकवू शकला. शिवभक्तांचा दबाव आणि रेट्यामुळे आपटेचे बॉस त्याला वाचवू शकले नाहीत. जयदीप आपटे याच्यापेक्षा ज्यांनी त्याला अनुभव नसतानाही काम दिले ते बेकायदेशीर होते आणि हे सूत्रधार अजूनही सरकारमध्येच आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार? असा सवाल राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर राज्यात जी स्थिती निर्माण झाली आणि लोकभावना दडपण्याचा प्रयत्न झाला तो कुणालातरी पाठीशी घालण्यासाठीच व संपूर्ण कामात झालेल्या भ्रष्टाचार दडपण्यासाठीच होता. याविरोधात आमचा लढा आहे. कोट्यवधींचे टेंडर काढूनही प्रत्यक्षात 20-25 लाखात काम आटोपले. मंजूर झालेला खर्च आणि झालेले काम यातील तफावत पाहिल्यानंतर हा पुतळा कमी प्रतिचा झाल्याचे दिसते आणि आपले मुख्यमंत्री म्हणतात तो ताशी 45 किलोमीटर वाऱ्याने पडला.

मराठवाड्यातील रस्त्यांची कामं गुजरातच्या ठेकेदाराला

राज्यात सध्या कशातही भ्रष्टाचार होऊ शकतो. सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच भ्रष्टाचार करतंय. शिवरायांचा महाराष्ट्रात लूट चालू आहे. गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्रा लुटत आहेत. काल आम्ही ओल्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर गेलो होते. परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड येथील रस्ते वाहून गेले आहेत. तिथल्या लोकांनी आमच्यासमोर काही कागदपत्र ठेवली. या ग्रामीण भागातील रस्त्यांची कामंही गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आलेली आहेत. गुजरातमधील सरस्वती कंस्ट्रक्शन नावाची कंपनी असून तिला परभणी, हिंगोलीतील रस्त्यांची कामं देण्यात आलेली आहेत. महाराष्ट्रात चांगली मुलं, इंजिनियर नाहीत का? असा सवालही राऊत यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

कृषीमंत्र्यांनी दिलेली वागणूक शेतकरी विसणार नाही

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसह आम्ही मराठवाड्यात फिरलो. ओल्या दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर आहे. गुरं, ढोरं, घरं, पिकं वाहून गेली असून सरकारने पंचनामे केलेले नाहीत. आदित्य ठाकरे येणार हे कळल्यावर राज्याचे कृषीमंत्री काही भागात पाहणीचा फार्स करण्यासाठी गेले. ते गाडीतून उतरलेसुद्धा नाहीत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत. एवढेच नाही तर काही मागण्यांसाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर निर्घृणपणे ते ओरडले. कृषीमंत्र्यांनी दिलेली वागणूक शेतकरी विसरणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)