शिवसेनेच्या आमदारांच्या आसपासही फिरकण्याची कोणाची हिंमत नाही! संजय राऊत 

2919
sanjay-raut-press-conferenc

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना दै.सामनातील गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखावरून प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की शिवसेनेच्या आमदारांच्या आसपासही फिरकण्याची कोणाची हिंमत नाही. काही जण आम्हाला संपर्क करत असल्याची माहिती विरोधी पक्षातील आमदारांनी आपल्या कानावर घातल्याचे सांगत असताना राऊत म्हणाले की संपर्क साधणारे हे बाटगे कोण आहेत हे जनतेसमोर येईलच.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच गोड बातमी मिळेल असे विधान केले होते. यावर प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की ही गोड बातमी घेऊन स्वत: सुधीरभाऊ येतील आणि सांगतील की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल.

पत्रकारांनी राऊत यांना भाजप आज राज्यपालांना भेटणार असून ते सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रूत म्हणाले की ‘ज्यांच्याकडे 145चे संख्याबळ आहे त्यांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी राज्याला मजबूत सरकार दिलं पाहीजे. जर आज कोणी सत्तास्थापनेसाठी दावा करत असेल तर मी त्यांचे स्वागत करतो.’

ज्यांच्या हातात सत्ता, एजन्सी, पैसा असतो त्यांच्याकडून आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न सातत्याने होत असतात. अशा अस्थिर परिस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने केला जातो. ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांच्याकडून असे प्रयत्न महाराष्ट्रात,कर्नाटकात झारखंड किंवा हरयाणामध्ये  केले जातात. मात्र यंदा महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचा आमदार आमदार फुटणार नाही असे राऊत यांनी सांगितले. फोडाफोडीचे राजकारण जरी नवीन नसले तरी जे साधनशुचिता, नैतिकतेचं राजकारण करू इच्छितात त्यांनी हे हातखंडे वापरू नयेत.कारण आपण जर देशाला पारदर्शक कारभार करण्याचे वचन दिले आहे अशा शब्दात राऊत यांनी असले राजकारण करणाऱ्यांना सुनावले आहे.

काँग्रेसच्या काही तरुण आमदारांनी आपण शिवसेनेसोबत जायला हवे अशी भूमिका मांडली आहे. याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की हे आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्यांनी विधानसभेत येण्याआधी आपापल्या भागात मोठं काम केलं आहे. त्या आमदारांच्या भावना अशा असतील तर त्या भावना या राज्यातल्या जनतेच्या आहेत असं मी मानतो.

देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी नेता म्हणून निवडले आहे फडणवीसांसोबत आमचे वैयक्तिक भांडण नाहीये. त्यांच्यासोबत आमचे संबंध चांगले आहेत. मात्र ही लढाई ही सत्य आणि असत्याची किंवा धर्म अधर्माची आहे. बाकी भाजपच्या नेता, मंत्र्यांसोबत आमचे सगळ्यांसोबत चांगले आहेत आणि राहतील असे राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्येठेवणार असल्याबद्दल काही पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की या अफवा कोण उठवतंय ते आम्ही शोधून काढू. जे लोकं ही अफवा उडवत आहेत त्यांनी आपले आमदार सांभाळावेत असा टोलाही त्यांनी हाणला. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना आज मातोश्रीवर बोलावण्यात आलं असून तिथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांना मार्गदर्शन करणार आहे असे राऊत यांनी सांगितले. राज्यात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीमध्ये शिवसेना काय करणार आहे या बद्दलही उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत असं राऊत यांनी सांगितले.

मी जे बोलतो त्याद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तसेच शिवसेना पक्षाची भूमिका मांडत असतो असे संजय राऊत यांनी म्हटले. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा बनेल. माझी आशा आकांक्षा ही मंत्री किंवा मुख्यमंत्री बनण्याची नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. मी पक्षासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतो असे त्यांनी म्हटले

आपली प्रतिक्रिया द्या