ज्यांच्यात क्षमता आहे असे वाटायचे त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केलं! संजय राऊतांनी तोफ डागली

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे एखादा व्यंगचित्रकार देशात निर्माण व्हावा आणि त्याने देशातील एकाधिकारशाही, मनमानी याविरोधात आसूड ओढावा अशी आम्ही नेहमी देवाकडे प्रार्थना करतो. ज्यांच्यात ही क्षमता आहे असं आम्हाला वाटायचं, त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केलं अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली. भोंग्याविरोधातील आंदोलनाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, गेल्या 24 तासात लाखो हिंदूंनी नाराजी व्यक्त केली आहे. शिर्डी, त्र्यंबकेश्वरसह असंख्य तीर्थस्थानी काल आणि आज काकडआरती होऊ शकली नाही यामुळे असंख्य भाविक श्रद्धाळू नाराज झाले आहे. तुम्ही मशिदीवरच्या भोंग्यांचं राजकारण सुरू केलं आणि ते हिंदूंच्या गळ्यापर्यंत आलं आहे.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना कोणत्याही भाडोत्री भोंग्यांची गरज वाटली नाही, बाळासाहेबांची व्यंगचित्रकला पुढे जाईल असं आम्हाला वाटलं होतं , पण दुर्दैवाने भाजपने त्या व्यंगचित्रकलेचा गळा घोटलं आहे आणि राज्यात आज वेगळं चित्र दिसतंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार डेव्हीड लो हे बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श होते. लो यांच्या व्यंगचित्रांनी मोठमोठ्या हुकूमशहांना घाम फोडला होता. त्याबाबत बाळासाहेब आम्हाला अनेकदा सांगायचे असे संजय राऊत म्हणाले. डेव्हीड लो यांचा दरारा, दहशत काय असेल हे बाळासाहेब जेव्हा हातामध्ये कुंचला घ्यायचे तेव्हा आम्हाला अनुभवायला मिळायचे असे त्यांनी म्हटले. कुंचला आणि वाणी या दोन अमोघ शस्त्रांनी बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात नाही तर देशात सत्तापरिवर्तन केलं. ही कुंचल्याची ताकद आहे, म्हणून आजही आम्ही रंगचित्राच्या कुंचल्यापुढे नतमस्तक होतो असे राऊत यांनी म्हटले आहे.