धमक्या देणाऱ्यांची तेवढी ताकद नाही, सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे! संजय राऊत यांची प्रतिक्रिया

sanjay-raut

सभेतून धमक्या, इशारे दिल्या म्हणजे परिस्थिती बिघडली असं होणार नाही, इशारे दिले म्हणजे अ‍ॅक्शन होते या भ्रमात कोणी राहू नये असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बजावलं आहे. 4 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत म्हटलं होतं. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की एखाद्या पक्षाने अल्टीमेटम दिला म्हणून राज्य चालत नाही आणि निर्णयही घेतले जात नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून येथील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आहे. राज्याच्या प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना प्रशासन चालवायचा फार मोठा अनुभव आहे त्यामुळे कोणी मनात आणलं म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू शकत नाही.

यापूर्वी 100दिवसांत महागाई कमी होणार असा अल्टीमेटम दिला होता, महागाई झाली का कमी ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. ज्यांची स्वत:ची हिम्मत नाही असे बिनहिम्मतीचे लोकं मग छोटेमोठे लोकं, पक्ष पकडतात आणि आमच्यावर हल्ले करायला लावतात. हिंदू ओवेसींना सुपारी देऊन महाराष्ट्रातील शांतता बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षाला सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे असे राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे सरकार सक्षम असून कोणाच्या मनात आलं म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू शकत नाही. राज्याच्या प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना प्रशासन चालवायचा फार मोठा अनुभव आहे. कोणी उठतो आणि धमकी देतो असं होणार नाही. धमक्या देणाऱ्यांची तेवढी ताकद नाही, मात्र त्यांच्यामागे ज्या शक्ती, अस्वस्थ आत्मे आहेत. ज्यांना सत्तेवर येता आले नाही, ज्यांना महाराष्ट्रातून लोकांनी दूर केलं आहे. त्यांचं वैफल्य ते दुसऱ्यांच्या माध्यमातून ते बाहेर काढत आहेत. त्यांनी समोरून लढायला पाहिजे मात्र जर ते अशा प्रकारे सुपाऱ्या देऊन आमच्याशी लढू पाहात असतील तर त्यांनी ते करत राहावे, त्यातच त्यांचा वेळ जाणार आहे असं राऊत यांनी म्हटले आहे. .

मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार संपूर्ण देशात जी भूमिका घेतली जाईल ती महाराष्ट्रातही घेतली जाईल. या राज्यात बेकायदेशीर असं कोणतंही कृत्य केलं जाणार नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री संयमी आणि सक्षम नेते आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम आणि मजबूत नेते आहेत आणि मविआचे मार्गदर्शक शरद पवार हे सगळ्यात अनुभवी नेते आणि प्रशासक आहेत. यामुळे कोणी अल्टीमेटम देऊन वातावरण बिघडवायचा प्रयत्न करणार असतील तर ते भ्रमात आहेत, राज्यात असं काहीही होऊ शकत नाही. राज्यात कोणी फुले विरूद्ध टिळक वाद लावणार असतील तर ते वाद देखील निरर्थक आहे. टिळक आणि फुले यांच्याविषयी वाद निर्माण करून जे वादाला फोडणी घालतायत त्यांचे मनसुबे फसलेले आहेत असे राऊत यांनी म्हटले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या,महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, बेळगांवचा मुद्दा संपलेला नाही. जमीन तुमची नाही, जमीन देशाची आहे. बेळगांवच्या जनतेवर अन्याय झाला आहे आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत कोणालाही असे विधान करता येणार नाही.