मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत टोमणे मारण्याचे काम जास्त झाले, पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नव्हती! संजय राऊतांची टीका

बुधवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीतील घडलेल्या प्रसंगांवर बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या बैठकीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना आपली नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत टोमणे मारण्याचे काम जास्त झाले, पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नव्हती अशा शब्दात राऊत यांनी टीका केली आहे. बुधवारी पार पडलेली बैठक ही एकतर्फी संवाद होता आणि या बैठकीतील व्हॅटबाबतचा विषय हा अनावश्यक होता असं बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असल्याचे राऊत यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान कोरोनाबाबतच्या स्थितीवर मार्गदर्शन करणार अशी चर्चा होती, मात्र पंतप्रधानांनी इतर विषयांवरच जास्त तारा छेडल्या. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर राव यांची वक्यव्य पाहिल्यास कळेल की तो एकतर्फी संवाद होता.या बैठकीनंतर द्धव ठाकरे यांनी मराठी बाण्याला जागून त्यांना जे सांगायचंय ते सांगितलंय, असे संजय राऊत म्हणाले.

2017 साली भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार बनणार होते असं भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले होते. याबाबत राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कोणीतरी अफवा पसरवतंय, मला माहिती आहे काय घडणार होतं आणि काय घडणार आहे. उद्या काय घडणार आहे हे देखील मला माहिती आहे. त्यामुळे जुन्या पाचोळ्यावर पाय ठेवून उगाच कशाला आवाज करताय? नवनीत राणा आणि लकडावाला यांच्यातील आर्थिक व्यवहारांबाबत विचारलं असता राऊत म्हणाले की, युसूफ लकडावालासोबत कोणी आर्थिक व्यवहार गैरव्यवहार केलाय याबाबत बोला. जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर द्या. उत्तर नसल्याने हा फोटो काढा तो फोटो काढा असं सुरू होतं. मोबाईलच्या जमान्यात कोणाचाही कोणासोबत फोटो येऊ शकतात. लग्नात, उत्सवात कोणीही बाजूला येऊन उभं राहतं, त्यात काही अर्थ नाही. सत्य बोललं की त्यापासून पळ काढायचा आणि दुसऱ्या विषयाकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करायचा हे त्यांचं धोरण आहे.