शरद पवारांकडे युपीएचे नेतृत्व देण्याच्या मागणीबाबत संजय राऊत यांचे महत्वाचे विधान

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित होते. याबैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवावे असा ठराव मांडण्यात आला होता जो संमतही करण्यात आला. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना या घडामोडींबाबत विचारलं असता ते म्हणाले की, बिगर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपविरोधकांना एकत्र आणण्याचे काम शरद पवार उत्तमरित्या करू शकतात. हे सगळ्यांना ठावूक असल्यानेच त्यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद सोपवावे अशी भूमिका घेतली जात आहे. आम्ही ही भूमिका पूर्वीच मांडली असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांना वरुण गांधी यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना त्यांनी ही भेट सदीच्छा भेट होती असं सांगितलं. वरुण हे उत्तम लेखक असून ते अनेक विषयांवर चांगल्या गप्पा मारतात. भेटीमध्ये राजकीय विषय चर्चेत निघत असतात असं राऊत यांनी सांगितले.

पत्रकारांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना रिफायनरी प्रकल्पाबद्दलही प्रश्न विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की या प्रकल्पाला नाणारमधील स्थानिकांचा विरोध आहे. प्रकल्पामुळे तिथली शेती, फळबागा, तिथला समुद्र, तिथले मच्छिमार यांना हानी पोहचेल, त्यांची रोजीरोटी बुडेल अशी स्थानिकांना भीती वाटते आहे. विदर्भातील नेते, माजी आमदार आशीष देशमुख यांनी नुकतीच संजय राऊत यांनी भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी रिफायनरी प्रकल्प विदर्भात नेता आला तर आम्ही त्याचे स्वागत करू असे आपल्याला सांगितले असं राऊत म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या आसपास काही पाण्याच्या जागा आहेत, तिथे हा प्रकल्प होऊ शकला तर त्याचा फायदा महाराष्ट्राला , विदर्भाला होईल अशी देशमुख यांनी भूमिका मांडली आहे. याचा अर्थ असा आहे की प्रकल्पाला विरोध नाही, विरोध हा स्थानिकांच्या रोजीरोटी, फळबागा, शेती, मच्छिमारीचे नुकसान होऊ नये यासाठी आहे असे राऊत म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पासाठी दुसऱ्या जागेचा पर्याय सुचवला असेल तर तो यासाठीच सुचवला असेल असं राऊत यांनी म्हटले आहे. प्रकल्पाला, कोणत्याही विकास कामाला, राष्ट्रीय विकासाला खीळ घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने किंवा शिवसेनेने कधीच पुढाकार घेतलेला नाही असेही ते म्हणाले.