जामिनाच्या अपिलावर एवढी अर्जंसी का? हायकोर्टाचा ईडीला सवाल; 12 डिसेंबरला सुनावणी निश्चित

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला आव्हान देत ईडीने सोमवारी उच्च न्यायालयात नव्याने अपील दाखल केले. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी तपास यंत्रणेच्या अपिलाची दखल घेतली, मात्र तातडीच्या सुनावणीची मागणी करण्यामागे एवढी अर्जंसी का, असा सवाल केला. त्यावर ईडीने विशेष न्यायालयाच्या निकालामुळे यंत्रणेच्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायमूर्तींनी ईडीच्या अपिलावर 12 डिसेंबरला सुनावणी निश्चित केली.

संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने 9 नोव्हेंबरला जामीन मंजूर केला. त्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ईडीने गेल्या आठवडय़ात न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे दाद मागितली होती, मात्र संबंधित एकलपीठाने सुनावणीला नकार दिला होता. त्यानंतर सोमवारी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठापुढे अपील दाखल केले तसेच तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली. यावेळी न्यायमूर्तींनी जामीन रद्द करण्याच्या अपिलावर सुनावणीसाठी एवढी अर्जंसी का आहे, असा प्रश्न केला. त्यावर सिंह यांनी विशेष पीएमएलए न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणामुळे तपास यंत्रणेच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. त्याचा ईडीला त्रास होत आहे, असा युक्तिवाद करत तातडीच्या सुनावणीकरिता विनंती केली. त्यानंतर न्यायमूर्ती प्रभुदेसाई यांनी 12 डिसेंबरला सुनावणी घेण्याचे निश्चित केले. यावेळी न्यायालयात संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदारगी हजर होते.