केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते नाशिकमध्ये भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. मणिपूर, उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्था, जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडून गृहमंत्री महाराष्ट्रात भाजपच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येत आहेत. गृहमंत्री मणिपूरमधील परिस्थितीचा, कश्मिरच्या सीमेवरील अतिरेकी हल्ल्यांचा, लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये घुसलेल्या चिनी सैन्याचा आढावा घेत नाहीत, पण उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी गृहखात्याच्या विशेष विमानाने येतात, ही गंमतीची गोष्ट आहे. याचाचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भाजपची खटिया खडी होत आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते.
गृहमंत्र्यांची आढावा बैठख हा फार्स आहे. निवडणुकीत मजमोजणी करताना आमच्या बाजूने रहा असा दम ते जिल्हाधिकारी, अधिकाऱ्यांना देणार आहेत. या पलिकडे काय आढावा घेणार? असा सवाल करत संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी येतात. हा गेल्या 10 वर्षातील देशाचा अनुभव आहे. लोकसभेलाही त्यांनी काही मतदारसंघात अशाप्रकारचे राष्ट्रीय कार्य केलेले आहे, म्हणून ते सत्तेवर आले. पण मला चिंता एवढीच वाटते की जेव्हा अमित शहा, नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात तेव्हा एखादा उद्योग बाहेर जातो. नाशिकमधील लोकांनी सावध रहायला हवे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्रातील जनतेने भाजपचा हिशेब चुकता केला!
धोका दिला… धोका दिला… ही पिपाणी वाजवणाऱ्या अमित शहा यांचा खरपूस समाचार घेत संजय राऊत म्हणाले की, धोका कुणी कुणाला दिला हे महाराष्ट्र जाणतो. म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपचा हिशेब चुकता केला. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वत: अमित शहा यांनी महाराष्ट्राला आणि शिवसेनेला धोका दिला. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र खोलीत जी चर्चा झाली, जे शब्द दिले-घेतले त्या संदर्भात अमित शहा यांनी धोकेबाजी केली. हे सगळ्यांना माहिती असून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा हिशेब लोकसभा निवडणुकीत चुकता केला. त्याच्यामुळे या राज्याची जनता कुणावर विश्वास ठेवते हे सांगायला नको, असेही राऊत यावेळी म्हणाले.
‘गॉडफादर’च्या स्वागताला मुख्यमंत्रीही येऊ शकतात!
अमित शहा यांच्या स्वागतासाठी मिंधे गटाने होर्डिंग्ज लावले आहेत. यावरही संजय राऊत यांनी परखड भाष्य केले. ते म्हणाले की, शहांचा मुलगा आला तरी मुख्यमंत्री स्वागताला येतील. लाचार, लोचट आणि स्वाभिमानशून्य सराकर इथे बसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागतासाठी हजर राहणारच. भाजपच्या आढावा बैठकीसाठी गृहमंत्री येत असून मिध्यांच्या लोकांनी होर्डिंग्ज लावलेत, याचा अर्थ मुख्यमंत्री दिल्लीचे किती चाटुगिरी करतात हे दिसते. त्यांच्या लोकांनी होर्डिंग्ज लावले आहेत, तर देखील इथे येऊ शकतात. शहा त्यांचे गॉडफादर असून ज्यांनी त्यांना एवढ्या करामती करून मुख्यमंत्रीपदीवर बसवले त्यांच्या स्वागताला ते स्वत:ही येऊ शकतात, असेही राऊत म्हणाले.
View this post on Instagram
वापरा आणि फेका हा भाजपचा इतिहास!
विधानसभेला भाजप सर्वाधिक जागा लढणार आणि मिंधे-अजितदादा गटाची कमी जागेत बोळवण करणार असे चित्र आहे. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, वापरा आणि फेका हा भाजपचा इतिहास आहे. सगळ्यात आधी अजित पवार यांचा काटा काढला जाईल आणि 2024 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री व त्यांच्या 40 जणांचा काटा अशा पद्धतीने काढला जाईल की कधी गळे कापले गेले हे त्यांना कळणारही नाही. मिंधेंच्या दाढीच्या केसाने की अजून कुणाच्या दाढीच्या केसाने कापले जातील ते पहात रहा. याची तयारी सुरू असून शहांच्या स्वागतासाठी ते 4 तास बैठक मारून बसले तरी त्यांचा गळा कापण्यापासून कुणी वाचवू शकत नाही, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्राची निवडणूक भाजपच्या हातातून गेली!
दरम्यान, शहांपाठोपाठ पंतप्रधान मोदीही महाराष्ट्रात येत आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची निवडणूक भाजपच्या हातातून गेलेली आहे. हरयाणाचीही निवडणूक त्यांच्या हातातून गेली आहे. जम्मू-काश्मीरमध्येही पराभव होत आहे. महाराष्ट्र हे फार मोठे आणि दिशादर्शक राज्य आहे. ते ज्या दिवशी महाराष्ट्र हरतील त्या दिवशी मोदींना पंतप्रधानांच्या खुर्चीवरून उतरवण्याची क्रिया प्रक्रिया सुरू झालेली असेल, असेही राऊत ठामपणे म्हणाले.