विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजुला ठेऊन गृहमंत्री महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी घटनाबाह्य सरकारला संरक्षण देण्यासाठी येत आहेत. ही गंभीर बाब असून फडणवीसांपासून भाजपचे इतर नेते कूचकामी आहेत म्हणून शहांना वॉर्डा वॉर्डात फिरावे लागत आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.
अमित शहा यांनी मणिपूरला जाऊन थांबले पाहिजे. कश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले सुरू असून तिकडे थांबायला हवे. देशात अनेक प्रश्न असून लडाख, अरुणाचलमध्ये चीनचे सैन्य घुसले आहे, तिकडे जाऊन त्यांनी पाहणी केली पाहिजे. पण महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारला संरक्षण देण्यासाठी ते इथे येत आहेत. मोदी, शहा महाराष्ट्रात आले की महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाईल किंवा महत्त्वाचा भूखंड तरी अदानीच्या घशात जाईल अशी भीती वाटते. आज शहा येताहेत आणि काल मिठागाराची 210 एकर जमीन अदानीला द्यायचा निर्णय झाला. त्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी, व्यवहार पाहण्यासाठी ते येताहेत का? असा सवाल राऊत यांनी केला.
देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणते काम केले पाहिजे या संदर्भात संविधानामध्ये काही नियम आहेत. ते सगळे बाजुला ठेऊन निवडणुका, भाजपचा प्रचार, लाडक्या उद्योगपतींना मदत आणि विरोधकांवर हल्ले यात गृहमंत्री गुंतले आहेत. त्यांनी सरदार पटेल यांचा इतिहास वाचवा. गृहमंत्री म्हणून त्यांनी किंवा इतरांनी कसे काम केले हे त्यांनी पहावे, असा सल्लाही राऊत यांनी दिला. तसेच व्यक्तिगत सुडाचे राजकारण करण्यासाठी शहा गृहमंत्रालयाचा वापर करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
शहांपाठोपाठ मोदीही महाराष्ट्रात येत आहेत. त्यांना वारंवार इथे यावे लागत आहे याचा अर्थ लोकमत त्यांच्याविरुद्ध आहे. पराभव स्पष्ट दिसत असून हातात काहीतरी पडावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मोदींनी पुण्यातील एकाच मेट्रोचे 6 वेळा उद्घाटन केले. शहा वॉर्डा वॉर्डात बैठक घेत आहेत. याचा अर्थ फडणवीसांपासून ते राज्यातील इतर भाजप नेते कूचकामी आहेत. त्यांनी सत्तेवर बसवलेले नेते कूचकामी आहेत. लोक त्यांना सत्तेतून पायउतार करणार असल्याने देशाच्या गृहमंत्र्यांना येथे येऊन ठाण मांडून बसावे लागत आहे. निवडणुका होईपर्यंत ते गृहमंत्रालय किंवा देशाची राजधानीही महाराष्ट्रात हलवू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
…तर सावरकरांनी कानाखाली मारली असती!
गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सरकार बैलबुद्धीचे असून निवडणुकीसाठी असे फंडे वापरले जात आहेत. महाराष्ट्रातील विद्वत्ता, चिंतनाचा दिल्लीतून येणाऱ्या बैलांनी बैलबाजार केला आहे. भाजपशासित राज्यांमध्ये गोमातेच्या कत्तली केल्या जातात, त्यावर त्यांनी बोलावे. राज्यमाता करून गायीचे रक्षण कसे करणार? त्यांनी हिंदूहृदयसम्राट वीर सावकर यांचे राज्यमातेविषयीचे म्हणणे समजून घ्यायला हवे. सावरकर असते तर हा निर्णय पाहून त्यांनी यांच्या (महायुती सरकार) कानाखाली मारली असती.