आपटे अचानक उपटले कसे? शिवपुतळा दुर्घटनेवरून संजय राऊत यांचा संतप्त सवाल, ठाणे कनेक्शनवर ठेवलं बोट

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी भेट देत पाहणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी मिंधे सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच लहानसहान मूर्ती बनवणाऱ्या शिल्पकार आपटेला छत्रपती शिवाजी महाराजांची टोलेजंग मूर्ती बनवण्याचे काम कुणी दिले? असा सवाल करत ठाणे कनेक्शनवरही राऊत यांनी बोट ठेवले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, शिल्पकार आपटेला अनुभव नव्हता. लहानसहान मूर्ती बनवणाऱ्या आपटेला छत्रपती शिवाजी महाराजांची टोलेजंग मूर्ती बनवण्याचे काम कुणी आणि कसे दिले? आरोपी आपटे असला तरी मुख्य आरोपी आपटेला काम देणारा ठाण्यातील सूत्रधार आहे. कारण इतक्या अनअनुभवी माणसाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या ऐतिहासिक पुतळ्याचे काम कुणी देऊच शकत नाही. जेजे स्कूल ऑफ आर्टच्या सल्लागार मंडळानेही हा पुतळा बेकायदेशीर असल्याचे म्हटले असून त्याची राज्याच्या सांस्कृतिक महासंचलनालयाकडून रितसर मान्यता घेतली नसल्याचेही समोर आले आहे.

एखादा पुतळा बनवताना परवानगी घ्यावी लागते. मात्र त्या संदर्भात कोणतेही काम झालेले नसताना हा पुतळा बांधला. शिल्पकाराने 5 फुटांचीच परवानगी घेतली होती आणि पुतळा मात्र 35 फुटांचा बनवला. विशेष म्हणजे तो बनवल्यानंतरही मान्यता घेतली नाही. त्यामुळे यात बरेच गुन्हेगार सामील असून त्यांना कुणाचातरी मोठा वरदस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. या शिल्पकाराला काम कुणी दिले? कुणी शिफारस केली? आपटे अचानक कसे उपटले? याचा शोध घ्यायला हवा, असेही राऊत यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील अटकेत, कोल्हापुरात झाली कारवाई

दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे येथे आले होते. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार वैभव नाईकही होते. आज आम्हाला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा छिन्नविछिन्न झाकून ठेवलेला पुतळा दुर्दैवाने पहाला लागतोय. पानशेतच्या प्रलयानंतर आणि लातूरच्या भूकंपानंतर महाराष्ट्राच्या समाजमानवर झालेला हा सर्वात मोठा आघात आहे. त्यामुळे याविरोधात प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक असून महाराष्ट्रातील पहिली प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांची होती. त्यांनी हातात काठी घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय फोडले, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

यावेळी राऊत यांनी 1 सप्टेंबरला मुंबईत महाविकास आघाडीचा विचार मोर्चा निघणार असून सरकारला ‘जोडे मारो’ आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, इतके होऊनही सरकार निर्लज्जपणे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. कारण त्यात आर्थिक व्यवहार गुंतलेले आहेत. आपल्या माणसाला, ठेकेदाराला काम देऊन पैसे काढण्यासाठी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडले नाही. मुख्यमंत्री, त्यांचे सहकारी, अधिकारीही खोटं बोलत असून वाऱ्याने पुतळा पडला म्हणतात. त्यांना जनाची, मनाची कशाचीही लाज उरलेली नाही. आता ते हे सर्व नौदलावर ढकलत आहेत. नौदलाने हिमालयामध्ये मोठे पुतळे, स्मारकं उभी केली आहेत. त्यांच्या बोटी वर्षानुवर्ष समुद्रात आहेत. मिंधे आपल्या पापाचे खापर नौदलावर टाकत आहेत यासारखे दुर्दैवी कृत्य कोणते नाही, असेही राऊत म्हणाले.

राजकोटवरील छत्रपतींचा पुतळा गडबडीत बसवला; निकृष्ट दर्जाचे सामान वापरले, खासदार शाहू महाराज यांचा आरोप