सूड आणि बदल्याचं राजकारण हाच पंतप्रधान मोदींचा अमृतकाल; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावात सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक-मालेगाव सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळत असून पक्षाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक येथे दाखल झाले आहेत. आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या सुडाच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. सरकारी यंत्रणा या एकाच पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, मुंबई विद्यापीठ, न्यायालय, ईडी, सीबीआय यांच्यावर किती विश्वास ठेवायचा अशी आज परिस्थिती आहे. ही सगळी दुकानदारी त्यांचीच असते, मला काही आरोप करायचे नाहीयेत. पण सगळ्या यंत्रणा या एकाच राजकीय पक्षाच्या आणि सत्तेच्या टाचेखाली काम करतात, हे कालच्या सूरतच्या न्यायालयावरून स्पष्ट झालं. राहुल गांधी संदर्भात जो निकाल देण्यात आला. ईडी, सीबीआय किंवा इतर यंत्रणा मग त्या शैक्षणिक संस्था असतील, त्या कशा दबावाखाली काम करतात ते सुद्धा स्पष्ट झालं आहे. या महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि मग निवडणुकांना सामोरं जायचं, अशी पडद्यामागची पटकथा लिहिली जात आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा मिळतोय, त्याच्यामुळे भाजप आणि त्यांचे बगलबच्चे हे हादरलेले आहेत. आणि आमच्याशी सामना करण्यासाठी मग काय करायचं, तर जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करायची. आणि आपण म्हणता तसे विषय निर्माण करून दंगली घडवायच्या आणि पुन्हा एकदा या राज्यात आणि देशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून निवडणुकांना सामोरं जायचं, असं एकंदरित कारस्थान दिसतंय. पण, ही पडद्यामागची पटकथा लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे या पटकथेला जनमानसात स्थान मिळणार नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, त्यांचं सगळं काही स्क्रिप्टेड होतं. या राजकारणात शिवसेनेला स्क्रिप्टेड काही करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाहीत. आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने काम करतो, विचार करतो. आमचा पक्ष स्वतःच्या पायावर उभा आहे. आम्ही जे ठरवलं ते पुढे नेलं. दुसऱ्यांची डोकी आम्हाला कामासाठी लागत नाहीत, असं राऊत यांनी म्हटलं.

विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पत्रावरून राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, त्या 14 पक्षांमध्ये शिवसेनाही आहे. त्यात चुकीच काय आहे? देशातील सर्वच यंत्रणा या आजच्या सत्ताधाऱ्यांच्या बटीक आणि गुलाम झाल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. भ्रष्टाचार हा एकाच पक्षाचा नसतो. भ्रष्टाचार जे सत्तेवर असतात त्यांचा सर्वाधिक असतो. पण आजच्या यंत्रणांना फक्त जे विरोधी पक्षात आहेत, जे सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक आहेत, त्यांच्याच चुका शोधून काढतात किंवा नसलेल्या चुकांना मोठं स्वरूप देतात, कारवाया करतात, दबाव आणतात, पक्ष फोडतात. सरकारं पाडतात. यासाठी या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जातो, हे आता लपून राहिलेलं नाही. हे आता उघड झालं आहे. पंतप्रधान मोदी म्हणतात हा अमृतकाल आहे. सूड आणि बदल्याचं राजकारण हाच त्यांचा अमृतकाल आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.