
”वीर सावरकर, महात्मा गांधी हे आपला इतिहास आहेत. तो इतिहास आजचं सरकार नष्ट करू पाहतंय. या सरकारला व त्यांच्या समर्थकांना वाटतंय की हा देश 2014 नंतर निर्माण झाला. त्या आधी हा देशच नव्हता. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले व हा देश निर्माण झाला, त्यांनंतर इतिहास निर्माण झाला. असा अपप्रचार केला जातोय. देशाला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळालं असं जे बोललं जातंय, असं बोलणं म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या हजारो लाखो क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्यांचा अपमान आहे.”, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
दैनिक सामनातील रोखठोकबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले. ”1975 ला जे संसद भवन उभारलं. माझ्यासारखा माणूस तिथे 20 -22 वर्ष बसतोय त्या भवनाला एक इतिहास आहे. त्या ससंद भवनात अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, घटनाकार यांनी देशाची निर्मिती केली. मी लेखात असं म्हटलंय की गोपाळ कृष्ण गोखले यांनी असं लिहलंय की ब्रिटनच्या संसदेत जेव्हा ते हिंदुस्थानच्या सुधारणांविषयी, कामांविषयी भेटायला जात होते तेव्हा तिथे त्यांच्यासोबत इतिहास चालतोय असं त्यांना वाटायचं. आम्ही इतिहास वाचणारी माणसं आहोत आणि ज्या संसद भवनात आम्ही कालपर्यंत बसलोय, ज्या ससंद भवनात आम्ही चालतोय तिथे महान लोकं बसून गेलेयत. त्यामुळे आम्हालाही वाटायचे की आमच्यासोबत इतिहास चालतोय. आम्ही इतिहासाचे साक्षीदार आहोत. नवीन संसद भवनात आम्हाला ती भावना निर्माण होईल का? आमचा आत्मा त्या संसद भवनात अडकलेला आहे. त्या संसद भवनात पंडित नेहरुंपासून गोविंद वल्लभ पंत, हिरेन मुखर्जी, इंदिरा गांधी, श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहार वाजपेयी, लालकृष्ण आड़वाणी यांचा इतिहास होता. घटनाकार, घटनापीठ सर्व काही तिथे होतं. त्या संसद भवनात देश घडला. ती सोडून आम्ही जिथे जातोय ती फक्त इमारत आहे. तिथे घटना नाही”, असे संजय राऊत यांनी सांगितले.
मोदीची तुलना स्टॅलिनसोबत केली असा असा सवाल पत्रकारांनी केला असता संजय राऊत यांनी आपण कुणाची तुलना केलेली नाही असं सांगितलं. ”मी कुणाचीही तुलना केली नाही. मी कुणाचं नाव घेतलं नाही. जगाला एक इतिहास आहे. जगाचा इतिहास चिरंतर आहे. तो 2014 ला निर्माण झालेला नाही. स्टॅलिन असो, लेनिन असो हिटलर मुसोलिनी असो अशा प्रत्येकाला इतिहास आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
देश राजेशाहीकडे जातोय
”देश सध्या राजेशाहीकडे जातोय असं मला वाटतंय तसंच ते संपूर्ण देशाला वाटतंय. ज्या प्रकारची राजवट, धर्मकांड आपण अनुभवतोय त्यामुळे तसं वाटणं स्वाभाविक आहे. लोकांना बोलू दिलं जात नाही. लिहू दिलं जात नाही. लोकांवर दबाव आहे. कायद्याचा गैरव्यापार करून सरकार आणलं जातंय, पाडलं जातंय. लोकांना त्रास दिला जातोय. त्याला काय म्हणाल तुम्ही, एकतर हुकुमशाही किंवा राजेशाही म्हटलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
”आम्ही लोकशाहीवादी आहोत. आमच्या विरोधात आंदोलन करायला आमची काही हरकत नाही. त्यांना पूर्ण अधिकार आहे. पण आंदोलन करण्याआधी ज्या संस्था संघटना आंदोलन करतायत त्यांचं गद्दार व बेईमान या प्रवृत्ती विषयी काय म्हणनं आहे ते त्यांनी आम्हाला सांगावं. छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर तसेच अनेक क्रांतिकरांनी गद्दार व बेईमानांना गोळ्या घातल्या आहेत. काही लोकं थुंकले असतील. काल मी वीर सावरकरांचं उदारहण दिलं. ते न्यायालयात एका गद्दाराला पाहून थुंकले. जर आम्ही सावरकरांना फॉलो केलं तर त्यांना अडचण का वाटतेय. या महाराष्ट्राच्या मातीत बेईमान व गद्दारांना स्थान नाही. जे आंदोलन करतायत त्यांनी गद्दारी व बेईमांनींविरोधात इतिहासात काय केलं ते वाचलं पाहिजे. गद्दारांना वाटतंय की लोकं आपल्याविरोधात खवळले आहेत त्या भीतीतून ही आंदोलन आहेत.” असं संजय राऊत म्हणाले.