बदलापूरात झालेल्या रेल रोको आंदोलनात विरोधकांनी काही माणसं घुसवल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाचा समाचार घेताना संजय राऊत यांनी गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे.
”ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या देखील विरोधकांनी मॅनेज केलेल्या असतील असा आरोप देखील ते करू शकतात. गिरीश महाजन यांचं डोकं फिरलेलं आहे. त्यांच्या डोक्यात घाणेरडं राजकारण आहे. अशा प्रकरणात तरी राजकारण करू नये. यात विरोधकांचा काय संबंध आहे. त्या मुली किती लहान आहेत. त्यांच्या पालकांची तक्रार घ्यायला तुमचे पोलीस तयार नाहीत. पोलिसांवर दबाव येत होता. त्यावर का तुम्ही बोलत नाही. म्हणून माझा सर्वोच्च न्यायालय व मोदींवर आक्षेप आहे. जे मोदी बलात्काऱाच्या प्रचाराला जातात. त्यांचेच हे महाजन व फडणवीस हस्तक आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
”जे मोदी कर्नाटकात प्रज्वल रेवण्णा या बलात्काऱ्याच्या प्रचारासाठी गेले. त्यांना तो बलात्कारी आहे हे माहित असतानाही ते प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराला जातात. त्याचं कौतुक करतात. त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देतात. त्या सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करता. बदलापूरात जो जनतेने आक्रोश केला तो नरेंद्र मोदींच्या वृत्तीविरोधात, मिंधे सरकारविरोधात होता. हे सराकर या प्रकरणात काही करणार नाही आणि बलात्काऱ्याला वाचवलं जाईल या वृत्ती विरोधात होता तो उद्रेक होता. या उद्रेकातून लोकं जर रस्त्यावर उतरली तर त्यांना तुम्ही गुन्हेगार ठरवता. महाराष्ट्राची अब्रू काढताय तुम्ही” असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.
तुमची मुलगी असती तर काय केले असते? महिलांचा महाजनांना संतप्त सवाल
अखेर दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन हे बदलापूर रेल्वे स्थानकात पोहोचले. आंदोलन मागे घ्यावे यासाठी ते हात जोडून मिनतवाऱ्या करत होते, परंतु आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना महाजन यांची अक्षरशः दमछाक झाली. ‘‘आता आंदोलन मागे घ्या, आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करू’’ असे ते सांगत होते. मात्र ‘‘आरोपीला फाशी द्या. मग आम्ही इथून निघून जातो’’ असे जमावाने ठणकावून सांगितले. ‘‘तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केले असते?’’ असा सवालही आंदोलनकर्त्या महिलांनी महाजन यांना केला. त्यावर महाजन निरुत्तर झाले.