‘निवडणूकांमध्ये चेहरा लादता येत नाही. लोकं ठरवतात त्यांना कोणता चेहरा हवाय ते. महायुतीतले सांगू शकतात का त्यांचा चेहरा कोणता आहे ते. त्यांचा तर तीन पैशांचा तमाशा आहे’, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील नेत्यांवर केली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
”महायुतीतले नेते सांगू शकतात का त्यांचा चेहरा कोणता आहे. मुख्यमंत्री स्वत: एका गटाचे आहेत. ते स्वत: ठामपणे सांगू शकतात का की माझ्या चेहऱ्यावर निवडणूका लढवून आम्ही जिंकणार आहोत. मूळात मुख्यमंत्र्यांच्या गटालाच कमी जागा मिळणार आहेत. 50 जागा तरी त्यांना मिळणार आहेत का? देवेंद्र फडणवीस, अजित पवार आहेत. पाहा त्यांचे काय चालले आहे . तीन पैशांचा तमाशा आहे तो”, असा घणाधघात संजय राऊत यांनी केला.
”महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूकीत एकत्रित काम केलं, प्रचार केला, त्याचा निकाल आपण पाहिला. आम्ही 31 जागा जिंकलो. काही जागा लांड्या लबाड्या करून मिळवल्या नाहीतर 35 जागा जिंकलो असतो. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात 35 जागा मिळवणं हे देखील थोडं नाही. लोकसभा वडणूकीत जी वज्रमूठ दाखवली, एकी दाखवली ती विधानसभेत देखील दाखवणार. त्याच पद्धतीने काम करणार. एकत्र बैठका सभा घेऊ. जाहीरनामा बनवू. उद्या ष्णमुखानंद येथे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते, जिल्हा- तालुका स्थळावरील कार्यकर्ते एकत्र य़ेतील. नक्कीच आम्हाला या व्यवस्थेचा फायदा होईल. उद्याच्या कार्यक्रमाचे यजमानपद आमच्याकडे आहे. उद्घाटनपर भाषण उद्धव ठाकरे करणार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.