लोकसभा अध्यक्षपदाची निवड झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ही जोडगोळी पुढे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील, असे विधान शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केले.
लोकसभा अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकसभेचे अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाला मिळाले नाही तर अमित शहा व नरेंद्र मोदी हे चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष व नितीश कुमार यांचा पक्ष फोडून त्यांच्या पक्षाच्या चिरफळय़ा केल्याशिवाय राहणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे भाजपचे पोलिटिकल एजंट आहेत. त्यांनी शिवसेनेबाबत घटनाबाह्य पद्धतीने निकाल दिला. तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो. भाजपची ही परंपरा आहे. अशी भिती संजय राऊत यांनी व्यक्त केली.
आम्ही पाठिंबा देऊ
चंद्राबाबू नायडू याच्या पक्षाला लोकसभेचे अध्यक्षपद हवे आहे. त्यांनी उमेदवार दिल्यास आम्ही चर्चा करून पाठिंबा देऊ. इंडिया आघाडीने ठरवले तर लोकसभेत आमचे बहुमत सिद्ध करू शकतो, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे.
मोदींचे पंतप्रधान पद काही दिवसांचे
माझ्या माहितीप्रमाणे भाजपच्या संसदीय बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झाली आहे. जर भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर निर्णय वेगळा दिसला असता, असे नमूद करताना मोदी हे पंतप्रधानपदावर काही दिवसांचे पाहुणे आहेत असे संजय राऊत म्हणाले.
कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो
देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना झिडकारले, नाकारले आहे. भाजपचा पराभव केला आहे. मोदींच्या झुंडशाहीचा, हुकूमशाहीचा संविधानविरोधी कृतीचा पराभव केला आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीने निवड होणे गरजेचे आहे. तसेच कायद्याने व घटनेने उपाध्यक्षपद हे आता विरोधी पक्षाला मिळायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले. मोदी टेकूवर बसले आहेत. टेकू कधीही पडू शकतो. राहुल गांधी आणि आम्ही कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.