
महाराष्ट्राने सीमाभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जाहीर केलेला कोट्यवधींचा निधी रोखण्याची घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली. याचा ‘दै. सामना‘च्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्य़ात आला. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी बोम्मईंना तुमच्या मनगटातील ताकद दाखवून देण्याचे आव्हान मिंधे-फडणवीस सरकारला दिले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री तुमच्यात हिंमत असेल तर सीमाभागात या योजना राबवून दाखवण्याचे आव्हान देत असून यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावे. शिवसेना तोडण्याची, भाजप बरोबर जाण्याची तुमच्यामध्ये हिंमत होती ना, तुमच्यामागे महाशक्ती आहे ना, मग हिंमत असेल तर ती महाशक्ती आता बोम्मईंना दाखवा. तुमच्या मनगटामध्ये ताकद असेल तर तिकडे तुमची हिंमत दाखवा, आमच्या अंगावर फुस्कारे सोडू नका, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना विधानसभा निवडणुकीवेळी भाजप 240 जागा लढणार, तर शिंदे गटाला 48 जागा देणार असल्याचे विधान केले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ही त्यांची लायकी आहे. 2014ला एका जागेसाठी, स्वाभिमानासाठी शिवसेनेने युती तोडली होती. त्यामुळे आता या 40, 45 जागा फेकलेले तुकडे आहेत आणि आयुष्यभर त्यांना हे तुकडे तोंडात चघळत जगावे लागणार आहे. उद्या पाच जागाही यांच्या तोंडावर फेकतील, यांना कसला स्वाभिमान. भाजपला शिवसेनेचा महाराष्ट्रातील रुबाब, दरारा संपवायचा होता, महाराष्ट्राचा स्वाभिमान तोडायचा होता म्हणून त्यांनी शिवसेना तोडली. ठीक आहे, खरी शिवसेना कोणती याचा फैसला जनते करेल, असेही ते म्हणाले.
खेडमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विराट सभेनंतर गद्दारांची चांगलीच तंतरली आहे. त्यामुळे याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ना, मग शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघण्यासाठी राज्यभर फिरा. पण ते स्वत:ला मुख्यमंत्री मानतात का? महाराष्ट्र तर मानत नाही. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांच्या आयुष्यात हाहाकार सुरू असून खेडमध्ये सभा घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी हे नुकसान बघण्यासाठी फिरावे. आमच्याविरुद्ध सभा कसल्या घेता आणि यातून तुम्हाला काय मिळणार असा सवाल करत राऊत म्हणाले की, आम्ही त्यांना पुरते नेस्तनाबूत, पराभूत करू. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने ज्या खुर्चीवर तुम्ही बसलेले आहात, निदान जोपर्यंत आहात तोपर्यंत शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या दु:खाची जाणीव ठेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचा, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
सामना अग्रलेख – 54 कोटींचा आरोग्य निधी, कर्नाटकचा मस्तवालपणा!
दरम्यान, शेतकऱ्यांच्या लाँग मार्चदरम्यान काल एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, हा सरकारचा हलगर्जीपणा आहे. सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत. जे दोन मंत्री चर्चेसाठी नेमले त्यांच्याकडून काही घडू शकले नाही. इतके फुसके मंत्री नेमले होते की त्यांचे कोण ऐकणार. मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही, पण शेतकरी रस्त्यावर आहे. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून त्याचे प्रायश्चित्त त्यांनी घेतले पाहिजे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल आहे. परंतु सरकार कोर्टबाजी, विरोधकांच्या नाड्या आवळण्यात रमले आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळला आहे तो बघा, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी थोडेसे राज्याकडे लक्ष देणे गरजेचे आहेत. अजूनही ते आपल्या गटातटाकडे पाहत असून त्यांना खुश करण्यातच त्यांचा वेळ जातोय, असा टोलाही त्यांनी लगावला.