हे गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार, यांची मानसिकताही गुन्हेगारी वृत्तीची; संजय राऊत कडाडले

Pc - Abhilash Pawar

मिहीर शहा ड्रग्जच्या नशेत होता. त्याच्या रक्तात त्याचे नमुने सापडू नये म्हणू तीन दिवस त्याला फरार केलेले. त्यानंतर त्याला आणून अटक करण्यात आलीा. त्यावरून मुंबई पोलिसांवरही संशय येतोय. हे सरकारचं मुळात गुन्हेगारांना पाठीशी घालणारं आहे. यांची मानसिकताही गुन्हेगारी वृत्तीची आहे. गुन्हेगारांना संरक्षण द्यायचं आणि आपल्या पक्षात सामिल करून घ्यायचं हेच यांचं सुरू असतं, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी पोलिसांनी मिहीर शहाला फाशीची शिक्षा मागावी असे म्हटले आहे.

”सरकारकडून आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे सर्व सामान्य प्रकरण नाही. पुण्यात जसं अगरवाल कुटुंब होतं. तशी इथे शहा कुटुंब आहे. बापाचा क्रिमिनल रेकॉर्ड तपासा. मिंध्यांचा जो नेता आहे त्याचा रेकॉर्ड पोलिसांकडे नसेल तर आम्ही देऊ. त्याचे कोणत्या अंडरवर्ल्ड डॉन सोबत संबंध आहेत. एवढ्या भारी गाड़्या कुठून येतात. एवढी संपत्ती कुठून आली. याचा हिशोब पोलिसांना करावा लागणार. हा व्यक्ती मुख्यमंत्र्‍यांचा खास कसा झाला. बोरिवली पोलीस ठाण्यात त्याचा रेकॉर्ड़ तपासा. नाहीतर मी मुंबई पोलिसांना आवाहन करतोय की त्यांचा रेकॉर्ड समोर आणा. एकनाथ शिंदे सोबत कसे लोकं बसलेयत ते समोर आले आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”मिहीर शहा ड्रग्जच्या नशेत होता. त्याच्या रक्तात ड्रग्जचे नमुने सापडू नये म्हणू तीन दिवस त्याला फरार केले. त्यानंतर त्याला आणून अटक करण्यात आली. त्यावरून मुंबई पोलिसांवरही संशय येतोय. महिलेला ज्या प्रकारे नशेत चिरडलं, रस्त्यावर फेकून पुन्हा चिरडलं. हा अमानुष प्रकार आहे. अशी व्यक्ती तुरुंगातून सुटता कामा नये. जर कोणी सोडवायचा प्रयत्न होत असेल तर त्यांच्या मंत्रालयात बसलेल्या आकाला लोकांनी प्रश्न केले पाहिजेत. महिलेला वारंवार गाडीखाली आणून चिरडण्याचा प्रयत्न झाला हा नशेत असलेला नराधम, पैशाची मस्ती असलेला नराधमच हे करू शकतो. एका महिलेची रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली. आणि मुंबई पोलिसांना तो तीन दिवस सापडला नाही यावर कुणी विश्वास ठेवेल का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मराठी चित्रपटसृष्टी गेली कुठे?

वरळीच्या हिट अँड रन प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या पुतणीचा मृत्यू झाला. त्यावर अद्याप मराठी इंडस्ट्रीतील कुणीही प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीला फटकारले आहे. ”आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री. एरव्ही काही ना काही बोलत असता. आता का नाही बोलत. कसला टाळकुटेपणा करतेय मराठी फिल्म इंडस्ट्री. आपल्या सहकाराची नातेवाईक अशा प्रकारे गाडीखाली चिरडली गेलीय त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसता. कसला मराठीपणा आहे तुमच्यात, अशा शब्दात संजय राऊत यांनी मराठी चित्रपटसृष्टीला फटकारले.