देशात अमृतकाल नाही तर ‘विष’काल सुरू असल्यासारखं वाटतं, संजय राऊत संतापले

भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत सडकछाप, गावगुंडाची भाषा वापरत बसपा खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली आणि धमकी दिली. बिधुरी शिवीगाळ करताना भाजप खासदार चक्क हसत होते. अशा खासदाराला फक्त संसदेतूनच नाही तर भाजपने पक्षातूनही निलंबित केले पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की नव्या संसदेतील पहिल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी एकता आणि एकात्मतेचा उल्लेख केला होता, त्याच सभागृहात त्यांच्यात पक्षाच्या खासदाराने शिवीगाळ केली. अशा खासदाराला पक्षाने नुसती नोटीस पाठवून उपयोग नाही कारण ती नौटंकी असते. अशा खासदाराला लोकसभेतून निलंबित केले पाहिजे आणि पक्षातूनही निलंबित केले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले. अशी भाषा ऐकल्यानंतर देशात अमृतकाल नाही तर विषकाल सुरू आहे असं वाटतं असे राऊत यांनी म्हटले.

गुरुवारी लोकसभेत चांद्रयान-3 मोहिमेवर चर्चा सुरू होती. त्यावेळी बसपा खासदार दानिश अली यांनी चांद्रयान-3चे श्रेय वैज्ञानिकांचे आहे, पंतप्रधान मोदींचे नाही, असे वक्तव्य केले. त्यावरून भाजपचे रमेश बिधुरी बोलण्यास उभे राहिले आणि त्यांनी शिव्यांचा भडीमार सुरू केला. ‘ए xxx  ए उग्रवादी… ए कटुवा… हे दहशतवादी आहेत. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं ऐकू नका, बाहेर फेका याला….’ असे रमेश बिधुरी म्हणत असल्याचे व्हीडिओत दिसत आहेत. बिधुरी बरळत होते तेव्हा डॉ. हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद हे भाजप नेते हसत होते. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठली. सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, भाजपने बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.