मी उद्योजिका

>>संजीवनी धुरी-जाधव<<

आपल्यापैकी प्रत्येकीत एक उद्योजिका असतेच. ती हाती घेतलेले काम स्वत:चा ठसा उमटकत पूर्ण करत असते. प्रत्येक वेळी उद्योजक होण्यासाठी मोठे भांडवल, उच्च शिक्षण हाताशी असतेच असे नाही. आपल्या भवती अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर स्वत:चे विश्व निर्माण केले आहे. आणि उद्योजिका म्हणून त्या यशस्वी होत आहेत.

बाबांची इच्छा पूर्ण करतेय!
वडिलांच्या आजारपणात होती नव्हती तेवढी सगळी जमापुंजी खर्च झाली… त्यात वडिलोपार्जित व्यवसाय बंद पडायला आलेला… इतकी वर्षे वडिलांनी जोडलेला ग्राहक दुरावत चाललेला… त्यात वडिलांची इच्छा होती हा व्यवसाय मुलीने सांभाळावा… अखेर तिने शेअर मार्केटमधली नोकरी सोडली आणि वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला. हे सोपं काम नव्हते तरीही तिने ते करुन दाखवले. कोणतेही काम हे छोटे नसते असे म्हणत आज ती ऊसाच्या गुऱ्हाळ्यात येणाऱ्या ग्राहकाला ऊसाचा रस काढून देते. ही तरुणी म्हणजे प्रभादेवी येथील सुजाता कामठे.

सुजाताने बी.ए पूर्ण केलंय. शेअर मार्केटमध्ये एका शेअर ब्रोकर्सकडे डेटा स्कॅनिंगचे काम ती पाहत होती. दरम्यान तिच्या वडिलांना दहा महिन्यांपूर्वी कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी ते गुऱ्हाळ दुसऱ्याला चालवायला दिले होते आणि काही दिवसांपूर्वीच तिचे वडील कर्करोगाच्या आजाराने गेले. त्यांचं मत होतं की, मुली कुठेही कमी नसतात. म्हणूनच आपलं ऊसाचं गुऱ्हाळ सुजाताने सांभाळावं असं त्यांना वाटायचं… आणि आज बाबांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठीच ती नोकरी सोडून ते चालवतेय. सुरुवातीला तुला नाही जमणार असं सगळे म्हणाले, पण सुजाताने या सगळ्यांवर मात केलीय. एक जरी ग्राहक आला तरी त्याला ती ताजा रस काढून देते. हे काम करताना खूप छान वाटतंय. स्वतःसाठी काहीतरी करत असल्यासारखं तिला वाटतंय.

परिस्थितीच्या बेडय़ा तोडल्या!
कुठलंही शिक्षण नाही….घरात दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत… बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही… दिवसाला आठ रुपये मजुरीने काम करणारी एखादी साधी बाई जेव्हा उद्योजिका होते तेव्हा… विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. ही महिला म्हणजे कमल परदेशी. परिस्थितीच्या बेडय़ा तोडून आज त्या अंबिका मसाले हा ब्रॅण्ड चालवत आहेत. देश विदेशात त्यांचे मसाले प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या कार्याचे सध्या कौतुक होतंय.

कमल परदेशी या पुण्याच्या दौंड तालुक्यातील भांडगाव या छोटय़ाशा खेडय़ातल्या मजूर महिला. नऊवारी साडी, डोक्यावर पदर, कपाळावर कुंकू असे त्यांचे राहणीमान. त्यांच्या आवाजात गोडवा आहे हे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवते. त्या एक शेतमजूर होत्या. मजुरीतून त्यांना आठवडय़ातून एक दिवस वेळ मिळायचा. अशावेळी घर सारवायचे, मुलांचे कपडे धुवायचे, आठ दिवसाचे सरपण आणून ठेवायचे. मग त्यातच दिवस जायचा. पण सतत काहीतरी वेगळं करण्याची धडपड त्यांच्या मनात कायम होती. २००० साली बचत गटाची चळवळ सुरु होती. आपणही बचत गट करायचा असे त्यांना वाटायचे पण बचत करायची कशी हे माहित नव्हते. त्याबाबत बँकेत चौकशी करुन माहिती मिळवली. त्यांची महिन्याला शंभर रुपये भरण्याचीही परिस्थिती नव्हती. पैसे साठवायचे कसे हे माहित नसाताना महिन्याला २५ रुपये बचत करुन, काही महिलांना सोबत घेऊन मसाले बनविण्याचा घरगुती व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला आजुबाजुच्या गावात, हळूहळू मसाले विकत त्या पुणे, मुंबई करत आज परदेशातही त्यांचे मसाले प्रसिद्ध आहेत. सुरुवातीला चार महिला होतो आज दोनशे महिला काम करत असल्याचे कमल परदेशी सांगतात.

कर्ज फेडण्यासाठी टॅक्सीचा आधार
ऐन तारुण्यात नवऱ्याचा आधार गेला… त्यात बँकेचे व्याज… पदरात एक मुलगा… त्याचं शिक्षण… घरची जबाबदारी… घर चालवायचं कसं असा यक्षप्रश्न उभा… पण तरीही त्या हिंमत हरल्या नव्हत्या. अशावेळी हक्काचा आधार असा त्यांची टॅक्सी होती. मेहनत, जिद्द आणि आई-वडिलांची साथ यामुळे ती आज यशस्वी टॅक्सीचालक आहे. मीना कदम असं या जिद्दी महिलेचे नाव…

मीना कदम या प्रभादेवी येथील रहिवाशी… त्यांचे पती टॅक्सीचालक होते. त्यांनी जाण्यापूर्वी सहा महिने आधीच बँकेतून व्याजाने पैसे घेऊन स्वतःची टॅक्सी घेतली होती. टॅक्सी विकायचा विचारही मनात आला. कारण पैसे मिळवायचा वेगळा पर्यायही नव्हता. दुसऱ्याला टॅक्सी चालवायला दिली तर दिवसाला फक्त सहाशे रुपयेच मिळणार होते. एवढय़ा कमी पैशात बँकेचं व्याज फेडणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी स्वतःच गाडी चालवण्याचा निश्चय केला. त्यानंतर रोज टॅक्सीवर सराव केला आणि दोन महिन्यात त्या व्यवस्थित गाडी चालवू लागल्या. आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या या धाडसाचे फार कौतुक वाटतं.

लोकं आता त्यांना ओळखू लागली आहेत. आता मुलाला गाडीने शाळेत सोडते. त्यानंतर गाडी चालवते आणि तो घरी येण्याआधी परत येते. त्या आई-वडिलांच्या घरी राहतात. त्यांनी मुलीला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य दिलं. याआधी त्या कम्पाउंडर म्हणून काम करत होत्या.. रोज सकाळी ९.३०वाजल्यापासून त्यांच्या कामाला सुरुवात होते. आज टॅक्सी चालवताना बघून इतर महिलांनाही प्रोत्साहन मिळते, असंही मीना कदम सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या