अंगारकी अशीही साजरी करूया..

176

ज्योत्स्ना गाडगीळ

बाप्पाचा उपास करायला सगळय़ांनाच आवडते. अंगारकी चतुर्थी आता येऊ घातलीए. आजी–आजोबांसाठी थोडी वेगळय़ा प्रकारची अंगारकी…

गणपती बाप्पा सगळ्यांचाच आवडता… अंगारकी चतुर्थी अर्थात कृष्ण पक्षातील चौथा दिवस, जो दर महिन्यात येतो, त्याला आपण चतुर्थी म्हणतो. ती मंगळवारी आली की तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणतात. गेल्या वर्षभरात तो योग एकदाही जुळून आला नाही तर या वर्षभरात तो एकदा सोडून तीनदा आला आहे. १४ फेब्रुवारी, १३ जून आणि ७ नोव्हेंबर!

आपल्या घरातील अनेक ज्येष्ठ अंगारकीच्या निमित्ताने आवर्जून उपवास करतात. अमंगळ समजल्या जाणाऱया मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते.

अंगारकीचा उपवास आनंददायी व्हावा यासाठी सगळ्यांनी या निमित्ताने एकत्र यावे. त्यानिमित्ताने छोटे गेट टुगेदर करता येईल. उपवासाचे पदार्थ एकत्र बसून खावेत. गणपती ही ज्ञान-विज्ञानाची देवता. एखादा समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प… उदा. वाचन, पुस्तकांचे वाटप किंवा अभिवाचनाचा कार्यक्रम करता येईल. सर्वांनी मिळून अथर्वशीर्षाचे पठण करता येईल. शिक्षणाची, शिकवण्याची आवड असेल तर ज्येष्ठांनी विद्यार्थ्यांकडून संस्कृतचे धडे गिरवून घ्यावेत. बरंच काही करता येईल.

सर्व शास्त्रांमध्ये पारंगत असलेल्या गणपतीने दूर्वांचे आयुर्वेदातील महत्त्व ओळखून त्यांना जवळ केले. अंगारकीच्या निमित्ताने आपलाही त्यांच्याशी क्षणिक संबंध येतो. त्यांचे महत्त्व जाणून तो संबंध आपण वाढवायचा असतो. अथर्वशीर्षात गणेशस्तुती केलेली आहे, त्याचे पारायण केल्यामुळे आपली भाषाशुद्धी होते. भाषा शुद्ध झाली की विचार आणि आचारही शुद्ध होतात. मनुष्याची अंतर्बाह्य शुद्धी झाली की त्याच्या कामाचा श्रीगणेशा होतो आणि कामांनाही गती येते. एवढया सगळ्या गोष्टी या अंगारकी चतुर्थीने साध्य होतात, म्हणून तिचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे!

उपवासासाठी फिटनेस टिप्स

उपवासाच्या पदार्थांचा आस्वाद घ्या.

कर्बोदकयुक्त पदार्थ प्रमाणात आणि सकाळी खा. उदा. साबुदाणा खिचडी, बटाटय़ाचा किस.

दर दोन-तीन तासांनी खा.

आहारात कर्बोदकांसोबत फळं, ताक, नारळपाणी याचा आवर्जून समावेश करा.

तळलेल्या पदार्थांचा उदा. बटाटा वेफर्स किंवा तत्सम पदार्थांचा माफक प्रमाणात सकाळी आस्वाद घ्या.

गुळाची कोणतीही चिक्की आवर्जून खा.

मसाला दूध प्या.

पाणी भरपूर प्या.

दुपारच्या जेवणात वऱ्याचे तांदूळ, उपवासाचे थालीपीठ, उकडलेल्या बटाटय़ाची भाजी या पदार्थांचा समावेश करा.

दही, ताक आवर्जून घ्या.

उपवास आनंदी करा

अंगारकी चतुर्थीला काहीजण अन्न-पाणीही घेत नाहीत. अगदी कडकडीत उपवास करतात. पण वय वाढलेलं… त्यात दिवसभर पोटात अन्न नाही, पाणी नाही… यामुळे स्वाभाविकच शरीर निस्तेज होईल, स्वभाव चिडचिडा होतो. शरीरच साथ देत नसेल तर मनात सात्त्विक भाव कुठून येणार…? मग असा भक्त त्या बाप्पाला कसा आवडेल? उपवासाच्या दिवशी फळे, दूध, फळांचा रस असा सात्त्विक आहार घ्यायला हवा. मुळात उपास हा देवासाठी नसून तो देहासाठी असतो! त्याला अध्यात्माची जोड असेल तर मनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.

……………………………………

संकष्ट चतुर्थी २०१७

१५ जानेवारी, रविवार – संकष्ट चतुर्थी
१४ फेब्रुवारी, मंगळवार – अंगारक संकष्ट चतुर्थी
१६ मार्च, गुरुवार – संकष्ट चतुर्थी
१४ एप्रिल, शुक्रवार – संकष्ट चतुर्थी
१४ मे, रविवार – संकष्ट चतुर्थी
१३ जून, मंगळवार – अंगारक संकष्ट चतुर्थी
१२ जुलै, बुधवार – संकष्ट चतुर्थी
११ ऑगस्ट, शुक्रवार – संकष्ट चतुर्थी
९ सप्टेंबर, शनिवार – संकष्ट चतुर्थी
८ ऑक्टोबर, रविवार – संकष्ट चतुर्थी
७ नोव्हेंबर, मंगळवार – अंगारक संकष्ट चतुर्थी
६ डिसेंबर, बुधवार – संकष्ट चतुर्थी

आपली प्रतिक्रिया द्या