संकष्टीचा उपवास

4097

>>दा. कृ. सोमण<<

पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

आज संकष्टी चतुर्थी. बहुसंख्येने बाप्पाचा उपवास मनोभावे केलाजातो. काय असेल यामागील कार्यकारण भाव

हिंदू संस्कृतीमध्ये उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘उपवास’ म्हणजे अन्नपाणी आणि सर्व भोग वर्ज्य करून राहणे, परंतु सर्वसाधारणपणे उपवासाचा अर्थ ‘हलका व कमी आहार घेणे’ असा गृहीत धरला जातो. उपनिषदकालीही जाणत्या लोकांना उपवासाचे महत्त्व माहीत झाले होते. वेदवचनाचा आधार घेऊन यज्ञ, दान, तप आणि उपवास हे परमेश्वरप्राप्तीचे चार मार्ग असे सांगितले गेले आहेत. तपाच्या निरनिराळ्या प्रकारांत उपवास हा मुख्य व श्रेष्ठ आहे, असे महाभारतात सांगितले आहे.

धार्मिकदृष्टय़ा पापक्षालनासाठी, ईश्वरप्राप्तीसाठी, पुण्यप्राप्तीसाठी आणि प्रायश्चित्त म्हणून उपवासाचे व्रत केले जाते, परंतु आधुनिक काळात सांगायचे तर शरीराच्या आरोग्यासाठीही उपवासाची आवश्यकता आहे. आधुनिक भाषेत आपण उपवासाला ‘डाएटिंग’ असेही म्हणू शकतो. हलका आहार घेतला तर शरीरातील मांद्य कमी होण्यास मदत होते. शरीर हलके राहिल्याने चपळता येते. आपली कार्यक्षमता वाढते. वजनावर नियंत्रण राहण्यास मदत होते. उपवास करण्याचा आणखी फायदा म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय आपणांस लागते. मनःस्वास्थ्य टिकविण्यासाठी आपणांस त्या सवयीचा खूप फायदा होतो.

उपवासामध्ये कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याबद्दल मतभिन्नता आहे. हलका आहार घेणे हा मूळ उद्देश आहे. एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे निर्जळी म्हणजे पाणीदेखील न पिता उपवास करणे योग्य नव्हे. ते आरोग्यास घातक असते. काही लोक फक्त फलाहार घेतात, तर काही फक्त दूध पिऊन उपवास करतात. काही लोक वऱ्यांचे तांदूळ (भगर), साबुदाणा, फळे खाऊन उपवास करतात. मात्र जर साबुदाणा तयार करण्याची पद्धत तुम्ही पाहिलीत तर उपवासालाच काय, कधीही साबुदाणा खाणार नाहीत. शिवाय मधुमेह असणाऱ्यांना आणि पोटाचे विकार असणाऱ्यांना साबुदाणा हा अतिशय वाईट आहे. त्यामुळे सध्या उपवासाला साबुदाणा खाण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे ही चांगली गोष्ट आहे.

प्रत्येक चांद्र महिन्यात मध्यान्हाला शुक्ल चतुर्थीच्या दिवसाला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हणतात. विनायक चतुर्थी जर मंगळवारी असेल तर तो ‘अंगारक योग’ समजला जातो. काही उपासक विनायक चतुर्थीच्या दिवशीही संपूर्ण दिवसभर उपवास करतात. चांद्र महिन्याच्या कृष्ण पक्षात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी असेल तर त्या दिवसाला ‘संकष्टी चतुर्थी’ असे म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर मंगळवार असेल तर ती संकष्टी चतुर्थी ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ समजली जाते. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन सोडला जातो. काही लोक संकष्टी चतुर्थीला संपूर्ण दिवस उपवास करतात. उपवास सोडताना जास्त जेवण घेणे योग्य नसते.

माणसाने इतरांशी माणुसकीने वागावे हे महत्त्वाचे असते. गरीब गरजू लोकांना मदत व्हावी यासाठी उपवास सोडताना दान करावयासही सांगण्यात आले आहे. मात्र पूजा-उपवास करताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावयाची असते. तसेच उपवास केल्यामुळे जर शरीराला त्रास होणार असेल तर उपवास केला नाही तरी चालतो. त्यामुळे पाप लागत नाही. उपवास असताना चुकून खाल्ले तरी पाप लागत नाही. परमेश्वर हा क्षमाशील आहे.

महर्षी व्यास आणि संत तुकारामांनी पाप-पुण्याची साधीसोपी आणि सरळ व्याख्या सांगितली आहे. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य!

श्रीगणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो दुःखहर्ता आहे, सुखकर्ता आहे अशी उपासकांची श्रद्धा असते. म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचे पूजन करून, अथर्वशीर्षाचा पाठ म्हणून, दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन यथाशक्ती गरीब-गरजूंना दान करून उपासाची पारणा केल्याने याच जन्मी समाधानाचे पुण्य प्राप्त करून घेता येते. आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो. जीवन आनंदी, सुखी व समाधानी होण्यास मदत होते.

आपली प्रतिक्रिया द्या