संक्रांत नोटाबंदीची !

अरुण म्हात्रे

संक्रांत आली… नोटाबंदीच्या रुपाने… अजूनही काय फरक पडलाय रोजच्या जगण्यात..!

मी अगदी शिणून गेलोय, जाम दमून गेलोय…
तनानं आणि मनानं…
धनानं शिणून गेलोय असं म्हणू शकत नाही, कारण आमच्या एटीएमच्या तळाला जी काही बारीक धार लागलीय ती काही थांबण्याचं नाव घेत नाही.
पूर्वी आमच्या चाळीत अशी बारीक नळाची धार रात्री लागायची, मग ही भांडी रांगेत लागायची. मग भांडय़ाला भांडं लागायचं आणि भांडाभांडी सुरू व्हायची.
आता एटीएममधून २००० रु. ची गुलाबी नोट येते.
आणि ‘धन्यवाद’ ची पाटी झळकते.
त्या ‘धन्यवाद’चा आवाज येतोसुद्धा. मला त्यातून पंतप्रधानांनी आपल्याला जोडलेले हात दिसतात.
नोटेवर गांधीजींचा फोटे आहे, पण नावाला अधिक खरडले तर त्यामागे मोदींचाच फोटो असणार अशी मला भीती वाटते, पण नोट खरवडून खरी आहे की नाही हे पडताळून पाहावेसे वाटते, पण परत ती बॅंकेने घेतली नाही तर?
नोटेचा रंग गुलाबी यासाठीच की पूर्वी व्यापारी खेळात अशाच नोटा असायच्या तशा आता सरकार स्वतःच नोटांचा नाणेबंदीचा खेळ खेळतंय, तर मग रंग असाच हवा !
या नोटांची गंमत पहा, कुणी म्हटलं नोटेचा रंग हाताला लागतो, तर रिझर्व्ह बॅंकवाले म्हणाले रंग जातो याचाच अर्थ ती खरी नोट आहे.
आता बोला – एरवी रस्त्यावर डुप्लिकेट माल विकणारेही म्हणतात, रंग गया तो पैसा वापिस! आता दुनिया बदललीय! आता रंग बदला तो भी नोट पक्की !
काळाचा महिमा बाबा, काळाचा महिमा!! सत्यही खोटेपणाइतकं तकलादू ! व्वा ! त्या गुलाबी नोटेने मात्र आयुष्यात खूप मजा आणलीय. खूप म्हणजे खूपच!!
परवा एका बँकेत एका खातेदाराने मॅनेजरला विचारले म्हणे – और कौन कौन से कलर मै है नोट ? आता खात्यात नि हातात पैसेच नसले तर असे विनोद करायला काय हरकत! ती २००० ची नोट हातात बघितली की आपल्याकडे दुकानदार, हॉटेलवाले, दूधवाले, पानटपरीवाले, इतकंच काय पण बॅंकवाले, लोनवाले, टॅक्सीवाले, रिक्षावाले, उबेरवाले, ओलावाले सारे अशा कुत्सिततेने पाहतात की ऑक्टोबर एसएससीला फ़ेल झाल्यासारखा मी खट्टू होतो. साधारणतः शिवाजी पार्कवाले धारावीतल्या माणसाकडे कसे पाहतात हे जरा आठवा म्हणजे कळेल माझी निराशा !
नाणेबंदीचा फ़टका हा आर्थिक खरा, पण त्यापेक्षा भावनिक चाबकाचे असे फ़टके इतके बसतात की, अपमानाचा रंगही आता काळय़ाऐवजी गुलाबी झालाय असे वाटू लागलेय !
परवा एक सासूबाई म्हणाल्या –
आमची नवी सूनबाई – एकदम दोन हजारांची नोट!
मी म्हटलं कशी ?
काही कामाची नाही! म्हणत सासूबाईंनी हात झटकले.
काळा पैसा बाहेर येईल म्हणून नोटा गुलाबी करण्याची कल्पना मोठी काव्यात्मकच !
ही गुलाबी नोटांची आयडिया देणारा माणूस एक तर खेळातला व्यापार – व्यापार गेम करणारा असावा किंवा काकोडकरांच्या कादंबऱ्या वाचणारा असावा.
पूर्वी काकोडकरांच्या कादंबऱ्यांत गुलाबी गालाची वर्णन असलेली पाने आम्ही दुमडून ठेवायचो आणि व्रतस्थपणे तेवढीच वाचायचो.
आमचा एक मित्र एखाद्याला डायबिटीस झाला की त्याचा शेवट गोड आहे असं म्हणायचा! आता तोच मित्र एटीएमच्या रांगेत मरण आलेल्या हुतात्म्यांना गुलाबी मरण असं म्हणतो. किती हे क्रौर्य ? किती हा उद्दामपणा?
आमच्या शेजारी एक सरकारी अधिकारी नाणेबंदी जाहीर झाल्यानंतर आजारीच पडले आणि बघता बघता एकदम भुजबळांसारखे दिसायला लागले. साधारणतः आपल्याकडल्या मालमत्तेचा हिशेब लागला नाही की जी अवस्था होते त्याला भुजबळ अवस्था म्हणतात तिकडे.
सध्या तसे देशात पांढऱया दाढीचा प्रभाव खूप आहे. साधारण अशा दाढीच्या लोकांनी,
आज ९ तारीख है ना, बोलो है ना !
कल ८ तारीख थी ना, बोलो बोलो थी ना !
इसका मतलब कल १० तारीख होगी ना, बोलो हॉं के नही ?
तो इसका मतलब, देश तरक्की कर रहा है की नही ?
असा पेच गर्दीपुढे टाकला तर गर्दी हॉं, हॉं कर रहा है म्हणणारच!
नाणेबंदीच्या त्सुनामीने भले अनेकजण हुतात्मा झाले असतील, हजार-पाचशे नोटावाल्यांचे पतंग कट झाले असतील, पण नाणेबंदीचा गजर करणारे त्या सगळय़ा संक्रांतीवर ठाम उभे राहिलेत आणि आमच्यावर आलेल्या संक्रांतीचं गोड वर्णन करताहेत-
पैसे नाहीत पण भाषण आहे,
वाताहत झाली, पण आश्वासन आहे
काळय़ा पैशाचा पत्ता नाही, पण जिंकल्याचा जोश आहे
संक्रांतीचा एक उत्तम नारा असता.. काहीही झालं तरी तो बोलावा लागतोच-
तीळगूळ घ्या नि गोड बोला आग्रहापर!
मी तिळगुळाची शप्पथ सांगतो, अच्छे दिन येणारच!
आमच्या किती पतंगी कट झाल्या तरी…
हो… हो…. बदल घडतोय…. घडतोय..
महाराष्ट्र बदलतोय…
कारण कोणीतरी वरून त्याला भाषणांनी सारखा बदडतोय…