‘जनां’ घडवी संस्कार!

922

>> ज्योत्स्ना गाडगीळ

कोणतीही कला जेव्हा एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता जनमानसात प्रवेश करते आणि सामूहिक अभिव्यक्तीचे माध्यम बनते, तेव्हा ती `लोककला’ म्हटली जाते. अशा अनेक कला आपल्या भारतभूमीत रुजल्या आहेत. ती स्थळकाळापुरती मर्यादित न राहता, तिचे स्वरूप देशव्यापी, विश्वव्यापी व्हावे, ह्या उद्दिष्टातून पुण्याचे पुरातत्व अभ्यासक हरिभाऊ वाकणकर ह्यांनी १९८१ मध्ये एक कला संघटना स्थापन केली, आणि तिचे नामकरण केले, `संस्कार भारती’!

साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्
प्रणवमूलं प्रगतिशीलं प्रखर राष्ट्रविवर्धकम्

आपल्या भारतभूमीतील कलांना नवजीवन देणे, प्रस्थापित कलाकारांना, नवोदित कलाकारांना आणि सर्व कलारसिकांना संघटित करणे, हे `संस्कार भारती’चे उद्दिष्ट आहे. ह्या देशव्यापी कलासंघटनेच्या ध्येय गीताच्या पहिल्या दोन ओळी वर दिल्या आहेत. संस्कारांच्या रूपाने रुजलेल्या कलांच्या माध्यमातून सर्व स्तरातील समाज एकत्र करण्याचे काम गेली ३५ वर्षे संस्कार भारतीतर्फे सातत्याने सुरू आहे. हे कार्य वेगाने व्हावे म्हणून `रथचक्र’ चिन्ह म्हणून वापरले आहे, तर `सा कला या विमुक्तये’ अर्थात `जी मुक्त करते, ती कला!’, असे बोधवाक्यात म्हटले आहे.

पुरातत्व शास्त्राचा खोलवर अभ्यास केलेले हरिभाऊ वाकणकर हे पद्मश्री पुरस्कार प्राप्त होते. कला हे संस्कार करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. कालांतराने ती लुप्त होऊ नये, म्हणून त्यांनी आपल्या साथीदारांसह `संस्कार भारती’ची निर्मिती केली. २० जणांनी सुरू केलेल्या संघटनेचे आज देशभरात ७०-८०,००० सभासद…नव्हे कार्यकर्ते आहेत. हो! कारण नुसती सभासद संख्या असून भागत नाही, अशा कार्यात कार्यकत्र्यांची जास्त गरज असते. तेच कार्य संस्कार भारती करते आणि ह्यातच ह्या संघटनेचे वेगळेपण आहे. क्रियाशील सदस्य आणि उपक्रमशील समिती हेच संघटनेचे धोरण आहे.

rangoli

संस्कार भारती म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते भलीमोठी गालिचा रांगोळी! मात्र हा एकमेव कलाप्रकार ह्या उपक्रमाचा भाग नसून नृत्य, नाट्य, चित्र, साहित्य, संगीत हेदेखील ह्या उपक्रमाचे अविभाज्य घटक आहेत. रांगोळी ही एक कला, जर ह्या संघटनेचा चेहरा होत असेल, तर ती संघटनेसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. आणि तिच्यामुळे संस्कार भारतीचे नाव समाजाच्या सर्व स्तरांवर पोहोचत आहे.

एकट्याने काढण्याची रांगोळी समुहाने काढली जाऊ लागली, तेव्हा आपसुकच `मी’ ते `आम्ही’ हे अंतर पार झाले. एकट्याने काढायची रांगोळी सामुहिकरित्या काढली जाऊ लागली. ती काढणाऱ्यालाच नव्हे तर बघणाऱ्यालाही नेत्रसुख देऊ लागली. हा उद्देश सर्वच ललित कलांच्या बाबतीत साध्य होऊ लागला. लोककलेतून हे प्रकार स्थानिक पातळीवर घडत होते, परंतु त्याचे स्वरूप मर्यादित होते. जसे की, शेतावर राबणारा शेतकरी संध्याकाळी देवाच्या भजन-कीर्तनात तल्लीन होत असे, सोबत असलेल्या लोकांनाही सामावून घेत असे, परंतु त्याची अंगभूत कला, ज्याकडे तो मनोरंजन म्हणून पाहतो, तिच्याकडे सादरीकरणाची कला म्हणून बघण्याची दृष्टी संस्कार भारतीने लोकांना दिली. संस्कार भारतीच्या आसेतुहिमाचल १६०० शाखा आहेत. हे काम स्वेच्छेने स्वीकारलेली अनेक मंडळी संघटनेचे उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतात. ह्या संघटनेतील जुने निवडक सदस्य आणि प्रतिष्ठित कलाकारांचा ६० जणांचा गट दर सहा महिन्यांनी पुढील कार्यक्रमाच्या आखणीसाठी भेटतो.

संस्कार भारतीच्या देशव्यापी कार्यक्रमाचे स्वरूप कसे असते, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? नुकतेच झालेले `सूत्रधार योगेश्वर’ हे महानाट्य आठवा! श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रावर आधारित नृत्य, नाट्य, साहित्य, संगीत ह्यांनी परिपूर्ण असे महानाट्य ११ फेब्रुवारी रोजी देशभरात एकाच दिवशी एकाच वेळी ७०० ठिकाणी करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी किमान १५० ते २०० कलाकारांचा समावेश होता. आसाममध्ये तर ४०० जणांनी मिळून महानाट्य सादर केले. हे एक उदाहरण झाले. परंतु यापूर्वीही असे वेगळे विषय काढून, औचित्य साधून सर्व कलाकारांसमवेत असे उपक्रम राबवले गेले आहेत. `ने मजसी ने’ ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताला १०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा अंदमान येथे कार्यक्रम ठेवला होता. `ए मेरे वतन के लोगो’ गाण्याला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा अरुणाचल प्रदेश येथील ४००० विद्यार्थ्यांसमवेत सामुहिक गीतगायन केले. डोंबिवली-ठाण्यातील महारांगोळी तर सर्वांच्या परिचयाची आहे.

गुढीपाडवा, व्यासपौर्णिमा, जन्माष्टमी, २६ जानेवारी ह्या चार सणांना संस्कार भारतीतर्फे मोठे कार्यक्रम केले जातात. ते कलाकार व रसिकांसाठी विनामुल्य असतात. विशेष म्हणजे तो कार्यक्रम गुरु-शिष्य मिळून सादर करतात. एकाच विषयात अनेक कलांचा संगम त्या उत्सवांमुळे बघायला मिळतो. तसेच, दर तीन वर्षांनी केवळ कलाकारांचे स्नेहसंमेलन म्हणून `कलासंगम’ हा कौटुंबिक सोहळा केला जातो. तर वर्षभर अनेक मासिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. जसे की, संगीत सभा, साहित्य संमेलन, रांगोळी शिबीर, नृत्य प्रशिक्षण, चित्रकला वर्ग! १०० रु. वार्षिक शुल्क भरून सभासदत्व दिले जाते आणि संस्कार भारतीच्या कार्यक्रमात कायमचे समाविष्ट करून घेतले जाते. सदस्यांची वार्षिक फी आणि सामाजिक संस्थांकडून कार्यक्रमासाठी मिळणारा निधी ह्यामुळे कार्यक्रमाची आर्थिक बाजू बऱ्यापैकी सावरली जाते. हे सामाजिक कार्य असल्याने सरकारी अनुदानासाठी संस्थेकडून कधी प्रयत्न झाले नाहीत. इथे सर्वांनी मानधनाची अपेक्षा न करता सामाजिक बांधिलकीने एकत्रित येणे अपेक्षित असते. ही जाणीव असलेले मोठमोठे कलाकार तसे करतातही!

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार वासुदेव कामत, ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले, अरुण नलावडे, गायिका पद्मजा पेâणाणी, राजदत्त, नाना पाटेकर, विनय आपटे अशी कलाक्षेत्रातील मंडळी, तसेच रघुराज देशपांडे, रविशंकर खरे, सुनील विश्वकर्मा, राजन जोशी अशी अनेक नामवंत मंडळी ह्या कार्याशी जोडलेली आहेत. काही कलाकार मानधनाची अपेक्षा सोडाच, उलट आपल्या वैयक्तिक कार्यक्रमाचे मानधन संघटनेला निधी म्हणून देतात. तळागाळातील कार्यकर्ते निरपेक्षपणे काम करतात. अनेक दाते स्वत:हून ह्या कार्यात यथाशक्ती खारीचा विंâवा सिंहाचा वाटा उचलतात. ह्या उपक्रमाचा प्रचार-प्रसार करतात. पुढच्या पिढीकडून तयारी करून घेतात. कार्यकत्र्यांची अशी फळी तयार होणे हेच संस्कारभारतीचे मूळ उद्दिष्ट आहे.

आपण म्हणतो, पण समाजात असे अनेक हात संस्कृती संवर्धनासाठी झटत आहेत. आपणही अशा उपक्रमांचा एक भाग होऊया आणि आपल्या संस्कृतीची पाळेमुळे आणखी खोलवर रुजवूया.

संस्कारभारतीचे सेतूबंधन

संस्कार भारती संघटनेच्या कार्यकत्र्यांपैकी एक नागपुरचे राष्ट्रीय सचिव चंद्रकांत घरोटे हे गेली ३२-३३ वर्षे आपली बँकेतील नोकरी सांभाळून संघटनेचे काम करत आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी पूर्ण वेळ ह्या कामासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. मुळातच कलेची आवड असलेले घरोटे पती-पत्नी संस्कार भारतीच्या प्रचारासाठी चार वेळा संपूर्ण भारत फिरले आहेत. आजवर त्यांनी १२०० रांगोळी शिबिरे घेतली आहेत, लाखो विद्यार्थ्यांना कलेशी आणि संस्कार भारतीशी जोडले आहे. एवढेच काय, तर ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, थायलंड येथे भरलेल्या वैश्विक कलासंमेलनात त्यांनी आपल्या साथीदारांसह भारतीय कला-परंपरांची झलक आणि गालिचा रांगोळीचे सादरीकरण केले आहे. तिथे रांगोळी मुबलक प्रमाणात न मिळाल्याने प्रसंगी रवा हातात घेऊन त्यांनी तिथल्या लोकांना रांगोळीचे प्रशिक्षण दिले आहे.

हातातून झरझर निघणारी रांगोळी परदेशातल्या लोकांना चमत्कारिक वाटते, हाताला मशिन तर लावले नाही ना, असे ते चाचपडून पाहतात, अवघ्या १५ मिनिटांत भलीमोठी नेत्रदीपक रांगोळी साकारलेली पाहून ते आश्चर्यचकित होतात आणि उत्सुकतेने आपल्या संस्कृतीची चौकशी करतात, असे घरोटे सांगतात. संस्कारभारतीशी असलेल्या नात्याबद्दल विचारले असता ते म्हणतात, `मी आणि माझ्यासारख्या कित्येक प्रापंचिक कार्यकत्र्यांनी आपल्या कामाचा व्याप सांभाळून हे सामाजिक काम केले आहे. नोकरीच्या रजा ह्या कार्यासाठी खर्च केल्या आहेत. संस्कार भारतीचा कार्यकर्ता हाच आमचा `बँक बॅलंस’ आहे. ह्या सर्वांतून काय मिळाले विचाराल, तर आत्मिक समाधान मिळाले. आपण समाजाचे देणे लागतो, ती समाजसेवा ह्या माध्यमातून करता आली. अनेक मान्यवरांना प्रत्यक्ष भेटता आले. आपल्या ठराविक परीघाबाहेर पडून आपल्या देशबांधवांशी संवाद साधता आला. आज ह्या उपक्रमात तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आता बालकलाकारांसाठी आणि आदिवासी भागातील कलाकारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.’

आपली प्रतिक्रिया द्या