मुक्ती पर्व – एक प्रेरणा दिवस

90

>>कृपा सागर<<

संत निरंकारी मिशनच्या वतीने दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी मुक्ती पर्व दिवस आयोजित केला जातो. या दिवशी एका बाजूला देशभर राजकीय स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला जातो तर दुसऱ्या बाजूला संत निरंकारी मिशन या आनंदामध्ये आत्मिक स्वातंत्र्यापासून मिळणारा आनंद समाविष्ट करून हा आनंद द्विगुणित करत मुक्ती पर्व दिवस साजरा करते. मिशनचे असे ठाम मत आहे की, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी ज्याप्रमाणे राजकीय स्वातंत्र्य अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे शांतीसुखासाठी आणि शाश्वत आनंदासाठी आत्मिक स्वातंत्र्य आवश्यक आहे.

सुरुवातीला बाबा अवतारसिंहजी यांच्या धर्मपत्नी माता बुद्धवंती यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात होता. त्यानंतर १७ सप्टेंबर, १९६९ रोजी बाबा अवतारसिंहजी ब्रह्मलीन झाल्यानंतर हा दिवस “जगतमाता-शहंशाह दिवस’’ म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि भाविक उभयतांच्या प्रति आपली श्रद्धासुमने अर्पण करू लागले. तथापि, १५ ऑगस्ट, १९७९ रोजी जेव्हा मंडळाचे प्रथम प्रधान लाभसिंहजी यांनी आपल्या देहाचा त्याग केला तेव्हा तत्कालीन सद्गुरू बाबा गुरबचनसिंहजी यांनी या दिवसाला “मुक्ती पर्व दिवस’’ हे नाव दिले. अलीकडच्या काळात देश-विदेशामध्ये मुक्ती पर्व दिवस त्या महापुरुषांच्या प्रति आपली श्रद्धासुमने अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो, जे मिशनचा संदेश सर्वदूर मानवमात्रांपर्यंत पोचवण्यासाठी आयुष्यभर समर्पित राहिले. २०१५ पासून या दिवसाशी निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी आणि २०१६ पासून बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचीही नावे जोडली गेली आहेत.

सध्या मुक्ती पर्व दिवस प्रेरणा दिवसाच्या रूपात साजरा केला जात आहे. माता बुद्धवंतीजी यांनी सद्गुरू आणि सेवादारांची सेवा करून प्रस्थापित केलेला महान आदर्श आजही निरंकारी जगतात प्रेरणास्रोत बनून राहिला आहे. बाबा अवतारसिंहजी यांनी गुरू आणि शिष्य यांच्या नात्याला इतके श्रेष्ठत्व प्रदान केले की, त्यांच्या पश्चात आजतागायत तो एक आदर्श बनून राहिला आहे. शिष्यत्वाच्या नात्याने त्यांनी आपले सद्गुरू बाबा बूटासिंहजी यांना त्यांच्या कुटुंबीयांसह स्वतःच्या घरी ठेवून घेतले आणि स्वतः तसेच माताजी यांनी त्यांची अविरत सेवा करून अनेक वरदाने प्राप्त केली.

बाबा अवतारसिंहजींनी मिशनच्या विचारधारेला पूर्णत्व प्रदान केले. मिशनचा प्रत्येक पैलू स्पष्ट केला. त्यांचे “अवतार बाणी’’ नावाचे पुस्तक प्रत्येक निरंकारी भक्ताला या दिशेने मार्गदर्शन करत असून यापुढेही निरंतर मार्गदर्शक बनून राहील. डिसेंबर, १९६२ मध्ये बाबा अवतारसिंहजी यांनी मिशनचे नेतृत्व बाबा गुरबचनसिंहजी यांच्या खांद्यावर सोपवले आणि स्वतः पुनश्च एक सामान्य भक्त (गुरसिख) म्हणून कार्य करू लागले. या रूपात त्यांनी तब्बल सात वर्षे आपण गुरूचे वचन जसेच्या तसे कसे मानावे याचे प्रात्यक्षिक स्वतःच्या महान जीवनाद्वारे प्रत्येक भक्ताला दाखवून दिले. त्यांच्यासमवेत आणखीही बरेचसे महापुरुष होते ज्यांनी ते सद्गुरूरूपात असताना यासंदर्भात फार मोठे योगदान दिले होते. तथापि, आता या भावनांना अधिक सदृढता प्राप्त झाली. संत निरंकारी मिशनचे प्रथम प्रधान तसेच अन्य सदस्यांबरोबरच अशा कित्येक महापुरुषांनी पदोपदी गुरु-शिष्याचे पावन नाते प्रमाणित केले. प्रत्येक भक्ताने तन-मन-धनाने समर्पित होऊन सद्गुरूची सेवा केली आणि ब्रह्मज्ञानाची दिव्य ज्योत जनसामान्यांपर्यंत पोचविण्यामध्ये महान योगदान दिले. या महापुरुषांनी आपल्या आरामाची किंवा सुखसाधनांची कधीही पर्वा केली नाही. सद्गुरूचा जसा आदेश आला आणि संकेत मिळाला त्याच दिशेने त्यांनी मार्गक्रमण केले; सत्संग, सेवा आणि स्मरणाची अनेक उदाहरणे प्रस्तुत केली.

दुसऱ्या बाजूला मिशनचा विस्तार वाढत गेला आणि निरंकारी परिवारही वाढला. बाबा गुरबचनसिंहजींनी मिशनची विचारधारा आणि खास करून ब्रह्मज्ञान भक्तांच्या कौटुंबिक व सामाजिक जीवनात उतरविले. त्यांच्या प्रत्येक सामाजिक रीतिरिवाजांमध्ये मिशनचा समावेश केला. अशाप्रकारे एका बाजूला मिशनच्या प्रति भक्तांचा विश्वास दृढ करत असतानाच मिशनचा सत्य, प्रेम, शांती व सद्भावनेचा संदेश सर्वदूर पोचवण्याचा प्रयत्न केला. बाबा गुरबचनसिंहजींच्या काळातही मिशनच्या भक्तगणांनी भरपूर योगदान दिले.

आज मुक्ती पर्वाच्या निमित्ताने या सर्व महान विभूतींना श्रद्धासुमने अर्पित केली जात असून त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या