संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे त्र्यंबकेश्वरहून संतांच्या जयघोषात प्रस्थान; वरूणराजाचीही सुखद हजेरी

आषाढी एकादशीनिमित्त संत-विठ्ठलनामाच्या जयघोषात त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आणि सोबत 40 वारकरी हे फुलांनी सजवलेल्या दोन शिवशाही बसने सोमवारी सकाळी साडेसहाला पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. विशेष म्हणजे पालखीच्या प्रस्थान सोहळ्यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि महिनाभरापासून पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या त्र्यंबकनगरीचा आनंद द्विगुणित झाला. सुमारे चारशे किलोमीटरचा प्रवास करीत ही पालखी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंढरपूरजवळील वाखरीत दाखल झाली.

palkhi-sohala-nashik

 (सर्व फोटो – भूषण पाटील, नाशिक)

त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिरात आज पहाटे काकडा आरती, पूजा व भजन झाले. या मंगलमय वातावरणातच पालखी पहाटे सवापाच वाजता मंदिरातून निघाली. तीर्थराज कुशावर्त येथे देवांचे स्नान झाले. नंतर अभंग गात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. मध्यरात्रीपासून त्र्यंबकेश्वरला वरूणराजाने हजेरी लावली. या सरींचा वर्षाव झेलतच पालखीसह 40 वारकऱ्यांनी टाळ-मृदूंगाचा गजर करीत संतांच्या जयघोषात साडेसहा वाजता पंढरपूरकडे दोन शिवशाही बसने प्रस्थान केले.

palkhi-st

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या बस पंढरपूरजवळील वाखरीत दाखल झाल्या, तेथून विठुरायाच्या दर्शनासाठी पालखी पुढे मार्गस्थ झाली. संत निवृत्तीनाथ महाराज मठात पालखीचा मुक्काम राहणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी 24 जुलैला पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल.

आपली प्रतिक्रिया द्या