गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळातर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सांताक्रुझ पूर्व वाकोला यशवंत नगर येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला बच्चे कंपनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने विद्यार्थांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले.
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मंडळाचे सर्वेसर्वा कार्याध्यक्ष व कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून या वर्षी गणेशोत्सवादरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, मोफत आरोग्य शिबीर, संगीत स्पर्धा तसेच विभागातील सोसायटय़ांना ओला व सुका कचरापेटीचे वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी आयोजित चित्रकला स्पर्धेत विभागातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आमदार संजय पोतनीस यांनी विशेष कौतुक केले. रविवारी मंडळातर्फे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व आरोग्य शिबीर संपन्नदेखील होणार आहे. मंडळाचे यंदाचे 40 वे वर्ष असून अयोध्येतील श्री राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. राम मंदिर पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.