
भव्य मंडप, विविध रंगांची विद्युत रोषणाई, मनमोहक सजावट अशा थाटात सांताक्रुझ पूर्व येथील वाकोल्यातील यशवंतनगरमधील शिवसेना शाखा क्रमांक 91 च्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सूर्यमंडळात विराजमान केलेल्या अष्टविनायकाला भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. श्रींच्या दर्शनासाठी व सजावट पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे.
कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा गणेशोत्सव साजरा केला जातो. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 39 वर्ष आहे. मुंबईत मोठय़ा प्रमाणात साजरा होणाऱया गणेशोत्सवात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आकर्षक सजावट, सुंदर गणेशमूर्तींवर भर देत असतात. मात्र, नेहमीच इतर मंडळांपेक्षा वेगळा आणि आकर्षक विषय निवडून त्यावर काम करणाऱया वाकोल्यातील यशवंतनगरमधील शिवसेना शाखा क्रमांक 91च्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एकाच मंडपात या वर्षी गणेशभक्तांना अष्टविनायकाचे दर्शन घडत आहे.
सामाजिक, पारंपरिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसचे प्रबोधनात्मक कार्यक्रमासह महिला, युवती आणि विद्यार्थ्यांना सहभागी करत मंडळाकडून सामाजिक वसा जपला जातो. या वर्षीही महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गायन स्पर्धा, भजन-कीर्तन, मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
असा आहे बाप्पाचा थाट
भव्य मंडपात 25 फूट बाय 50 फुटाचे डेकोरेशन करण्यात आले असून सूर्यमंडळामध्ये अष्टविनायक बसवण्यात आले आहेत. मंडपात येण्यासाठी 50 फूट बाय 19 फुटाचे प्रवेशद्वार उभारण्यात आले असून त्यावर 40 फुटांची भगवान शंकराची मूर्ती विराजमान आहे. मंडपापासून अर्धा किलोमीटरपर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.