नोकऱ्या बक्कळ आहेत, पण उत्तर हिंदुस्थानी लायक नाहीत – गंगवार

देशातील आर्थिक मंदीवरून सरकारवर टीकेची झोड उठत असताना केंद्रीय मंत्री मात्र अजब-गजब विधाने करत आहेत. अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहन क्षेत्रातील मंदीचे खापर ओला-उबरवर फोडल्यानंतर कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी नोकऱ्यांसाठी उत्तर हिंदुस्थानी लायक नसल्याचे विधान केले. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी आगपाखड केल्याने ‘नोकरीचे गँगवॉर’ निर्माण झाले आहे.
बरेलीत पत्रकारांशी बोलताना गंगवार म्हणाले, मी रोजगार मंत्रालयाची जबाबदारी सांभाळतो. मला वस्तुस्थिती माहीत आहे. नोकऱ्यांसंबंधी वर्तमानपत्रांमध्ये जे दावे केले जातात ते चुकीचे आहेत. देशात बक्कळ नोकऱ्या आहेत. रोजगार कार्यालयांबरोबर आमच्या मंत्रालयाचाही नोकऱ्या देण्याचा प्रयत्न आहे. उत्तर हिंदुस्थानात नोकरीसाठी लायक उमेदवारच सापडत नाहीत, असा दावा गंगवार यांनी केला. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडले आहे. गंगवार यांचे विधान उत्तर हिंदुस्थानातील नागरिकांचा अपमान करणारे असल्याचे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी ट्विट केले, तर बसपा अध्यक्षा मायावती यांनी गंगवार यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

नोकऱ्या बक्कळ आहेत, पण उत्तर हिंदुस्थानी लायक नाहीत. उत्तर हिंदुस्थानात चांगले शिक्षण घेतलेले युवक कमी आहेत. येथे नोकरभरती करण्यासाठी येणारे अधिकारीच उत्तर हिंदुस्थानींच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करतात. ज्या पदासाठी आम्ही भरती करतो त्या पदाला लायक व्यक्ती मिळत नाही, असे ते अधिकारी सांगतात. – संतोष गंगवार, केंद्रीय कामगार व रोजगार राज्य मंत्री

मंत्रीजी, पाचहून अधिक वर्षे आपले सरकार आहे. नव्या नोकऱ्या निर्माण झालेल्या नाहीत. ज्या नोकऱया होत्या त्यासुद्धा आर्थिक मंदीमुळे हातातून गेल्या. सरकार काहीतरी चांगले करेल याची वाट देशातील नवतरुण पाहताहेत. तुम्ही मात्र उत्तर हिंदुस्थानींचा अपमान करून पळवाट काढताय. हे चालणार नाही.- प्रियंका गांधी-वढेरा, काँग्रेस सरचिटणीस

देशातील आर्थिक मंदीसारख्या गंभीर समस्यांवर केंद्रीय मंत्री हास्यास्पद विधाने करताहेत. देशातील, विशेषतः उत्तर हिंदुस्थानींची बेरोजगारी कमी करण्याऐवजी उत्तर हिंदुस्थानीच लायक नाहीत, असे विधान करणे ही अत्यंत शरमेची बाब आहे. या विधानाबाबत केंद्रीय राज्य मंत्री गंगवार यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. – मायावती, बसपा अध्यक्षा

आपली प्रतिक्रिया द्या