नितेश राणे यांना यांचा जामीन अर्ज फेटाळला

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचारप्रमुख संतोष परब हल्लाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नीतेश राणे जिल्हा सत्र न्यायालयात आज शरण आले होते. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने देखील राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे राणे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

नीतेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळत जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसेच नियमित जामीनासाठी अर्ज करावा असे निर्देश दिले होते. यासाठी न्यायालयाने नीतेश राणे यांना 10 दिवसांची मुदत दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नीतेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण गेले. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान त्यांचे वकील सतीश मानेशिंदे आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला.

नीतेश राणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले असले तरी त्यांना शरण अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे जामिनाचा निर्णय होईपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवावी अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. सर्वोच्च न्यायलायाकडून दिलासा मिळेपर्यंत ते समोर आले नव्हते. या तपासात प्रगती होण्यासाठी नितेश राणेंची अटक अत्यावश्यक आहे, असा युक्तिवाद घरत यांनी केला.