सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, भाविकांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगगड निवासिनी देवीच्या नवरात्रोत्सवाला अतिशय आनंदात, भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. प्रारंभ दिनी सोमवारी, ( दि. 26) पहाटे विविध धार्मिक पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी देवीचे महावस्त्र आणि अलंकारांचे ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांच्या हस्ते ढोल-ताशांच्या गजरात पूजन करण्यात आले.

यावेळी परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये देवस्थान कर्मचारी, प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी नवरात्र यत्सव यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. घटस्थापनेची मुख्य महापूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, पालकमंत्री दादासाहेब भुसे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय, विश्वस्त बंडू कापसे, विश्वस्त अॅड. ललित निकम, विश्वस्त मनज्योत पाटील, विश्वस्त प्रशांत देवरे, विश्वस्त भूषणराज तळेकर, नितिन आरोटे (राजशिष्टाचार अधिकारी, नाशिक) व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख उपस्थित होते.

यंदा पहिल्या दिवशी 60 हजार भाविकांनी देवीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यापैकी 9-10 हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा उत्सवादरम्यान 2 वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा सुरू असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवेकरिता 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. सप्तशृंगगड परिसरात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, चुकामूक होऊ नये यासाठी उद्भोदन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

याकरिता 256 सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असून 170 सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील स्वयंसेवक तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे 10 व 3 बंदूकधारी सुरक्षारक्षक याशिवाय महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दल, कर्मचारी व अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहेत. ऐन वेळेस उद्भवणाऱ्या आपत्तीसाठी 24 तास अग्निशमन बंब सुविधा, प्रथोमपचार केंद्र देखील कार्यान्वित करण्यात आलेले आहे. न्यासाच्या वतीने सर्व भाविकांसाठी अल्प दरात निवास व्यवस्था असून न्यासाच्या परिसरात सर्वत्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ आणि न्यासाचे एकूण 5 जनरेटरद्वारे अखंडित विद्युत पुरवठ्यासाठी तैनात ठेवण्यात येणार आहे.

संस्थानमार्फत संपूर्ण गड परिसर स्वच्छतेसाठी 50 कर्मचारी नेमणूक करण्यात आले आहेत. याशिवाय भाविकांसाठी आपत्कालीन टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. 3 डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हँड मेटल डिटेक्टरद्वारे मंदिरात भाविकांची तपासणी करूनच त्यांना दर्शनाकरिता सोडण्यात येत आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर तसेच 8 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत पूर्णतः खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना नांदुरी येथून ने-आण करण्याची सोय करण्यात आली आहे. सप्तशृंगगडापासून 1 किलोमीटर अंतरावर तात्पुरते बस स्थानक उभारण्यात आले आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात यात्रा यशस्वितेसाठी न्यासाची विश्वस्त व्यवस्था आणि व्यवस्थापन आदींसह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग परिश्रम घेत असल्याची माहिती विश्वस्त संस्थेच्या वतीने व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली आहे.