विश्वचषक नेमबाजी स्पर्धा; सरबजोतचा ‘सुवर्ण’ वेध; वरुणला कांस्य!

हरयाणाच्या सरबजोत सिंहने भोपाळमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत हिंदुस्थानला पहिले सुवर्णपदक जिंकून देण्याचा बहुमान मिळविला. सरबजोतने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात हे सोनरी यश मिळविले, तर वरुण तोमरने कांस्यपदकाची कमाई केली.

सरबजोत सिंहने अंतिम फेरीत अझरबैजानच्या रुस्लान लुनेवचा 16-0 गुणफरकाने धुव्वा उडविला. पात्रता फेरीत त्याने 98, 97, 99, 97, 97, 97  अशी एकूण सर्वाधिक 585 गुणांची कमाई केली होती. चीनचा लियू जिनयाओ 584 गुणांसह दुसऱया स्थानी राहिला होता. अंतिम फेरीत सरबजोतनेल 253.2, तर रौप्यपदक विजेत्या रुस्लानने 251.9 गुणांची कमाई केली. वरुणला 250.3 तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले.

325 नेमबाजांचा सहभाग

हिंदुस्थानमध्ये सुरू असलेल्या जागतिक विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 33 देशांतील 325 नेमबाज सहभागी झाले आहेत. हिंदुस्थानसह जर्मनी, इस्राएल, अमेरिका, जपान, ब्राझील, चीन, झेक प्रजासत्ताक, अझरबैझान, डेन्मार्क, फ्रान्स, ब्रिटन, सिंगापूर, स्वित्झर्लंण्ड, स्वीडन असे मातब्बर संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.