राणेंच्या स्वाभिमानला पुन्हा धक्का; माजी पं.स.सदस्य आनंद भोगले व सरपंच नागेश आईर शिवसेनेत

2651

मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला धक्क्यावर धक्के देणे सुरूच ठेवले आहे. कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील माजी पं.स.सदस्य आनंद भोगले व रांगणा तुळसुलीचे विद्यमान सरपंच नागेश आईर यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश स्वाभिमानला मोठा धक्का मानला जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मधील कार्यक्रम शिवसेनेत दाखल होत आहेत. जिल्ह्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट झाला आहे. शिवसेनेत दिवसेंदिवस प्रवेशकर्त्यांची संख्या वाढत असून गावागावात भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांवर प्रेरीत होऊन तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून वेताळबांबर्डे जिल्हा परिषद विभागातील राणे समर्थक तथा माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले व रांगणा तुळसुली गावचे सरपंच नागेश आईर यांनी स्वाभिमानला रामराम करीत मंगळवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही प्रवेशकर्त्यांच्या हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख संजय पडते, देवेंद्र पडते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांवर प्रेरीत होऊन तसेच शिवसेना पक्षाच्या माध्यमातूनच खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक हेच विकास साधू शकतात तसेच जनतेचे प्रश्न सोडवू शकतात हे जाणून आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचे आनंद भोगले व नागेश आईर यांनी सांगितले. शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते व जिल्हा परिषदेचे शिवसेना गटनेते तथा वेताळबांबर्डे विभागाचे जि.प.सदस्य नागेंद्र परब यांनी या प्रवेशासाठी मोठे प्रयत्न केले. जि.प.गटनेते नागेंद्र परब यांनी खा.विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे तसेच जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे या विभागातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून संपूर्ण विभाग भगवामय करण्यावर नागेंद्र परब यांनी विशेष भर दिले आहे.

अजून धक्का देणार : पडते

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले की, आज माजी पं.स.सदस्य आनंद भोगले व रांगणा तुळसुलीचे सरपंच नागेश आईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. लवकरच याच वेताळबांबर्डे विभागातील आणखी काहीजण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या