कॅरममध्ये योगेश डोंगडे तर बुद्धिबळात नुबेरशाह शेख चॅम्पियन

6

सामना प्रतिनिधी । मुंबई

ठाणे, पालघर जिह्यांतील आदिवासींच्या शैक्षणिक विकासासाठी कार्य करणाऱया मुंबईच्या सार्थ प्रतिष्ठानने अंधेरीच्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवातील कॅरम प्रकारात राष्ट्रीय विजेता योगेश डोंगडेने पुरुष एकेरीचे तर आयेषा मोहम्मदने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. बुद्धिबळात राष्ट्रीय खेळाडू नुबेरशाह शेख अजिंक्य ठरला. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवात राज्यातील ९०० नामवंत क्रीडापटूंनी विक्रमी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक ‘दैनिक’ सामना होते.

शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश बोभाटे यांनी आयोजित केलेल्या सार्थ प्रतिष्ठानच्या क्रीडा महोत्सवात महाराष्ट्रातील ६० नामवंत टेबल टेनिसपटू, ३२५ कॅरमपटू, २५० बॅडमिंटनपटू व ३०० बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासींच्या शैक्षणिक विकासासाठी कार्य करणाऱया सार्थ प्रतिष्ठानच्या या महोत्सवाला एलआयसी, न्यू इंडिया ऍशुरन्स, ओरिएण्टल, भारत पेट्रोलियम, सारस्वत बँक आणि शामराव विठ्ठल बँक या समूहांचा पुरस्कार लाभला होता. समारोप सोहळ्यात दुर्धर आजाराने त्रस्त असलेला राष्ट्रीय कॅरमपटू बाबूलाल श्रीमल याला उपचारासाठी २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

सार्थ प्रतिष्ठानच्या समारोप सोहळ्याला मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, विलास पोतनीस, उपविभागप्रमुख सुजित राणे, नगरसेवक राजू पेडणेकर, शाखाप्रमुख प्रसाद आयरे, शरद यादव, किरण बाळसराफ, समाजसेवक बाळा कोपडे हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी लॉटरी विप्रेता सेनेच्या दिनदर्शिकेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे विश्वस्त उमेश नाईक, मंगेश कदम, विलास जाधव, अमोल कदम, मिनेश बोभाटे, नितीन शिरोडकर, स्वप्नील पांगले, दिनेश जैन, संभाजी शिंदे, प्रथमेश बोभाटे, अमोल लोंढे, अजय पाक्रोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रमुख पाहुण्यांनी घेतला कॅरम खेळाचा आस्वाद

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व सार्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी कॅरमच्या अंतिम लढतीपूर्वी प्रदर्शनीय बोर्ड खेळून कॅरम खेळाचा आस्वाद घेतला. प्रमुख पाहुण्यांच्या या प्रदर्शनीय लढतीने उपस्थित क्रीडाशौकिनांना व क्रीडापटूंना खूश केले. याप्रसंगी बोलताना खासदार राऊत यांनी सामाजिक जाणिवेतून आयोजित सार्थ प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या