
शेतकऱ्यांना व थकबाकीमुक्त गावांना विजेच्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असून, अशा गावांतील देखभाल दुरुस्तीची कामे तत्काळ करण्यासह नादुरुस्त रोहित्र 24 तासांत बदलून देण्याचे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादीकर यांनी रविवारी सातारा येथे दिले. दरम्यान, वीजबिल वसुलीत हयगय करणाऱ्या अभियंता, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भादीकर म्हणाले, ज्या गावांनी व शेतकऱ्यांनी वीज थकबाकी भरली आहे, त्यांच्या रोहित्रांची दुरुस्ती तातडीने करा. एकंबे (ता. कोरेगाव) गावातील 684 पैकी 275 शेतकऱयांनी 29 लाखांची थकबाकी एका दिवसात भरली आहे.उर्वरित शेतकऱ्यांनीही त्यांची थकबाकी भरावी. तर गावाला मिळणाऱ्या ‘कृषी आकस्मिक निधी’तून आठ दिवसांत सर्व कामे पूर्ण करावीत तसेच या गावांतील 30 मीटरच्या आतील सर्व शेती जोडण्या तत्काळ देण्याचेही त्यांनी सूचित केले.
साताऱ्यासह बारामती व सोलापूर मंडलांनी त्यांना दिलेले वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावावी. महसुलात घट झाल्यामुळे महावितरणची आर्थिक कोंडी झाली आहे. परिणामी वसुली मोहीम कठोरपणे राबवावी. वसुलीत हयगय करणाऱया अभियंता, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे भादीकर यांनी सांगितले.
यावेळी एकंबे येथील सरपंच शोभा कर्णे व दीपाली संतोष तारळकर या शेतकरी महिलेने 1 लाख 5 हजार वीजबिल भरल्याबद्दल त्यांचाही सन्मान महिला दिनाच्या पार्श्वभूमीकर भादीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
यावेळी भादीकर यांनी राजवाडा भागातील खंडित केलेल्या वीजजोडण्यांची पडताळणी करून काही व्यावसायिक ग्राहकांशी संवादही साधला.
प्रलंबित वीजजोडण्या आठ दिवसांत पूर्ण करा
बारामती परिमंडलात ‘महा कृषी उर्जा’ अभियानांतर्गत 30 मीटरच्या आतील पायाभूत सुविधा न लागणाऱ्या 6928 प्रलंबित जोडण्यांपैकी 5499 जोडण्या दिल्या आहेत, तर उर्वरित जोडण्याही 8 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश भादीकर यांनी दिले.