हेल्मेटची काच डोक्यात घुसून दुचाकीस्वाराचा मृत्यू

कंटेनरला पाठीमागून धडकल्यानंतर हेल्मेटची काच डोक्यात घुसून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाई तालुक्यातील वेळे शिवारात घडली आहे. गिरीश कृष्णा नायडू (वय 40, सिटी लेन, खराडी, पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे.

गिरीश नायडू हे पुण्याहून पाचगणीला निघाले होते. त्यावेळी केळे येथे आल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक नादुरुस्त कंटेनर उभा होता. या कंटेनरला गिरीश नायडू यांच्या दुचाकीची मागून जोरदार धडक बसली. अपघातात नायडू यांच्या दुचाकीचे हँडल, चाक तुटले. अपघातावेळी त्यांच्या डोक्यात हेल्मेट होते. मात्र, याच हेल्मेटची काच डोक्यात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, भुईंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नायडू यांना रुग्णालयात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. भुईंज पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.