सातारा जिल्ह्यात 16 ठिकाणी लसीकरण केंद्र, 24 हजार 410 आरोग्य सेवकांना मिळणार लस

राज्य सरकारच्या आदेशानुसार आरोग्य विभागाच्यावतीने सातारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 16 ठिकाणी लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 24 हजार 410 आरोग्य सेवकांना लसीकरण करण्यात येणार आहे.

कोविन अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक व काम करणार्‍या कर्मचार्‍यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. यानुसार सातारा जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. सरकार आणि खासगी आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना लसीकरण करण्यात येणार आहे.

कोविन अ‍ॅपवर ज्या कर्मचार्‍यांनी नोंदणी केली आहे. त्यांना ही लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील 4 हजार 417, फलटण 1 हजार 963, माण 1 हजार 406, पाटण 1 हजार 732, कोरेगाव 1 हजार 568, महाबळेश्वर 715, वाई 1 हजार 483, खंडाळा 909, खटाव 1 हजार 620, कराड 7 हजार 693, जावली 904 असे मिळून 24 हजार 410 जण लसीकरणाचे लाभार्थी आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर एका दिवशी सुमारे 100 जणांना लस टोचण्यात येणार आहे. 28 दिवसानंतर पुन्हा संबंधितांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालय सातारा, आर्यांग्ल आयुर्वेदिक कॉलेज सातारा, उपजिल्हा रुग्णालय कराड व फलटण, ग्रामीण रुग्णालय पाटण, कोरेगाव, जावली, माण, खंडाळा, महाबळेश्वर, कृष्णा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल कराड, मायणी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मायणी (ता. खटाव), मिशन हॉस्पिटल वाई, प्राथमिक आरोग्य केंद्र खटाव, फलटण व प्राथमिक आरोग्य केंद्र नागठाणे (ता. सातारा) या 16 लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

लस ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे 160 रेफ्रिजरेटर व 140 डीप फ्रीजर आहेत.लस ठेवण्यासाठी वातानुकूलित खोली तयार करण्यात आली आहे. तसेच 191 कोल्ड बॉक्स तयार ठेवण्यात आले आहेत. वॅक्सीन कॅरिअर 2 हजार 73 आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या