साताऱ्यात चोरांची अनोखी शक्कल, पीपीई किट्स घालून टाकला दरोडा; लाखो रुपयांचे सोने लंपास

कोरोना विषाणू प्रदूर्भावाच्या काळात पीपीई किट्स आणि मास्क यांचे महत्व वाढले आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील फलटण भागात सामसूम रस्त्याचा फायदा घेत मध्यरात्री पीपीई किट्स आणि मास्क घालून दरोडा टाकल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी रविवार पेठेतील हिराचंद कांतीलाल ज्वेलर्सवर धाडसी दरोडा टाकला आणि 78 तोळे सोने लंपास केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरोड्या प्रकरणात पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. यात  3  दरोडेखोर पीपीई किट्स, हात मोजे आणि मास्क घालून दुकान लुटताना दिसत आहेत. दरोडेखोरांनी दुकानाची भिंत फोडून आत प्रवेश केला. या नंतर शोकेसमध्ये लावलेले दागिने आणि आतील कपाटात असलेली दागिने असे सुमारे 78 तोळे सोने लंपास केले. या प्रकरणी दुकानाचे मालक अनिल शहा यांनी फलटण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे. पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध पथके तयार करुन शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या