साताऱ्यातील शंभराहून अधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

सातारा जिह्यात गावकारभारी निवडण्यासाठी अटीतटीने झालेल्या 652 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने अपेक्षेप्रमाणे दणदणीत यश संपादन करत वर्चस्व अबाधित राखले. जवळपास 80 ते 85 टक्के ग्रामपंचायतींवर विजयाचा झेंडा रोवत महाविकास आघाडीने हे यश मिळवले. पाटण, महाबळेश्वर-वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने चमकदार कामगिरी केली असून, जिह्यात जवळपास शंभर ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे. सातारा-जावली, माण-खटाव मतदारसंघात सत्ताधारी व विरोधकांकडून जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

महाविकास आघाडीने बिनविरोध व मतदान झालेल्या ग्रामपंचायतींपैकी 80 ते 85 टक्के ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व राखले आहे. शिवसेनेनेही सुमारे 100 ग्रामपंचायतींवर भगवा फडकावून जिह्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. याव्यतिरिक्त अनेक ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. जिह्यात अनेक गावांमध्ये सत्तांतर झाले आहे. त्यामध्ये वाठार किरोली, पाली, पार्ले, बनवडी, देऊर, सातारा रोड, अनपटवाडी, साखरवाडी, अतिट, विंग (ता. खंडाळा), जवळे ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी हा चमत्कार करून सत्ताधारी पॅनेलना पराभवाची चव चाखायला लावली आहे.

सातारा व जाकली तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत निर्विवाद सत्ता मिळवल्याचा दावा आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाने केला आहे. सातारा तालुक्यातील 130 ग्रामपंचायतींची निकडणूक लागली होती. त्यापैकी 37 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्करित ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. सातारा तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱया शेंद्रे (8-0), कोंडके (10-3), नागठाणे (17-0), कळंबे (9-0), किडगाव (9-0), ठोसेघर (7-0), बोरगाव (11-0), परळी, सासपडे, नुने (4-3), डोळेगांव (5-2), शिवाजीनगर, कुमठे (7-0), काढे (6-4), राकुसलेवाडी (5-0), सारखळ (5-2), नेले (5-2), पिलाणी (4-3), शिवाजीनगर, शेळकेवाडी, करंडी, परमाळे (4-3), काळोशी (5-2), कळसे, केणेगाव, अंगापूर, कुसवडे (5-4), कर्ये, लावंघर, आरे, दरे, कनगळ, मापरकाडी, केचले, नागेकाडी, कण्हेर, आगुंडेवाडी, अहिरेकाडी आदी बहुतांश ग्रामपंचायतींवर आमदार शिवेंद्रराजे गटाने सत्ता राखली.

जावली तालुक्यातील 75 पैकी 37 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. 38 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सर्जापूर, सरताळे, कुडाळ, महिगाक, सनपाने, आलेकाडी, दरे बुद्रुक, धोंडेवाडी, करंदोशी, काटवली, हातगेघर, पिंपळी, कहागांव, जरेकाडी, कोलेवाडी आदी ग्रामपंचायतींमध्येही विजय मिळवल्याचे आमदार भोसले गटातर्फे सांगण्यात आले. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, तर कराड उत्तरमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपापले गड राखले आहेत. दक्षिणमध्ये काही ठिकाणी अतुल भोसले गटाने काही धक्के दिले आहेत.

जावळी तालुक्यात 75 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 37 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर 37 ग्रामपंचायतींत काही ठिकाणी एक-दोन जागांसाठी, तर काही ठिकाणी तीन-चार जागांसाठी निवडणूक झाली. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळाले नसून, त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे, तर खामकरवाडी येथे 76 वर्षांच्या आजीबाईंनी एकाकी लढत देऊन फक्त एका मताने विजय मिळवला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या हुमगावात भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ यांनी बाजी मारली आहे.

फलटण तालुक्यात राजे गटाची बाजी

फलटण तालुक्यात चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत अपेक्षेप्रमाणे राजे गटाने बाजी मारली आहे, तर खासदार गटानेही काही ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या असल्या, तरी मतदारांनी दोन्ही गटांच्या लादलेल्या नेतृत्वाला घरी बसविण्याचे काम केले आहे. तालुक्यात 80 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यापैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, तर 138 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. कोळकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये अपेक्षेप्रमाणे राजे गटाने 17 पैकी 12 जागा जिंकल्या 4 ठिकाणी राजे गटाचे बंडखोर निवडून आले. भाजपला येथे भोपळाही फोडता आला नाही. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झाले. निंभोरे ग्रामपंचायतीमध्ये राजे गटाने सत्ता परिवर्तन करीत खासदार गटाला धक्का दिला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहायक मुकुंद रणवरे यांनी निंभोरेची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली आहे.

माण तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

माण तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्य़ा त्यापैकी 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 47 ग्रामपंचायतींत निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामधील 24 ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, बाळासाहेब सावंत यांच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळवली असून, 20 ग्रामपंचायतींत भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या वर्चस्वाखालील पॅनलने जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने व रासपाने एका ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे, तर तीन ग्रामपंचायती या पक्षविरहित आहेत.

कोरेगावातील 23 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व

ह कोरेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींपैकी 7 ग्रामपंचायती बिनविरोध, तर 12 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या होत्या, उरलेल्या 49 पैकी 23 ग्रामपंचायतींवर आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकला आहे. पेठ किन्हई, बोरजाईवाडी, भाकरवाडी, तांदुळवाडी, अंबवडे संमत वाघोली, मंगळापूर, ल्हासुर्णे, कठापूर, गोगावलेवाडी, गोडसेवाडी, रेवडी, देऊर, नलवडेवाडी (बिचुकले), पाडळी स्टेशन (सातारा रोड), अरबवाडी आणि जांब बुद्रुक या ग्रामपंचायतींचा त्यामध्ये समावेश आहे. बिनविरोध झालेल्या चिलेवाडी, नागेवाडी, बोधेवाडी (चिमणगाव), दुघी, होलेवाडी, कोलवडी व भिवडी या 7 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले असल्याचा दावा आमदार महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचा आहे.

महाबळेश्वरातील 18 ग्र्रामपंचायतींवर भगवा

महाबळेश्वर तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी पोलीस बंदोबस्तात येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा चौधरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. पूर्वेकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला असल्याचे, तर तालुक्यातील पश्चिमेकडे तापोळा भागात शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. भिलार येथील दोन जागा वगळता भाजपाच्या पदरात काहीही पडले नाही. 42 पैकी 18 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तालुकाप्रमुख संतोष जाधव, माजी नगराध्यक्ष, डी. एम. बावळेकर, माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांच्यासह शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला.

आपली प्रतिक्रिया द्या