कांदाटी खोऱ्यातील उचाट होणार ‘जंगल रेशीमचे गाव’; शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या नव्या संधी

‘पुस्तकांचे गाव’, ‘मधाचे गाव’ नंतर आता सातारा जिल्ह्यातील आणखी एका गावाला ‘जंगल रेशीमचे गाव’ अशी नवी ओळख प्राप्त होणार आहे. एका बाजूला कोयना धरणाचे बॅक वॉटर आणि दुसऱया बाजूला सह्याद्रीचा बेलाग कडा याच्यामध्ये अत्यंत दुर्गम ठिकाणी असलेल्या कांदाटी खोऱयातील उचाट या गावाला हा बहुमान मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ‘टसर’ नावाच्या अळीला या गावातील आयन नावाच्या झाडांवर सोडण्यात आले होते. त्यानंतर या अळीने उत्तम असे कोष तयार केले आहेत.

पश्चिम घाटाचा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध म्हणून ओळखला जातो. वन्यजीव आणि वनस्पतींच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या सातारा जिह्याच्या या पश्चिम भागातील महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून देशभरात ओळख प्राप्त झाली आहे. त्या पाठोपाठ महाबळेश्वर तालुक्यातीलच मांघर या गावाला ‘मधाचे गाव’ म्हणून ओळख मिळाली आहे. त्यानंतर आता कांदाटी खोऱयातील उचाट या दुर्गम प्रदेशातील गावाला ‘जंगल रेशीम गाव’ अशी ओळख मिळणार आहे. उचाटला जाण्यासाठी तापोळा किंवा बामणोली येथून मार्ग आहे. वाहनातून जायचे असल्यास तापोळा येथे तराफ्यातून वाहन न्यावे लागते. उचाटला रत्नागिरी जिह्यातील खेड येथून रघुवीर घाटातूनही जाता येते. खेडमार्गे एसटी बस उचाटपर्यंत पोहोचते.

रेशमी वस्त्र्ाांना जगाच्या बाजारपेठेत वलयांकित असे स्थान आहे. टसर रेशीमला ‘वन्य रेशीम’ असेही म्हणतात. महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा तसेच गोंदिया जिह्यात अशा प्रकल्पातून तेथील आदिवासी समुदायाला रोजगाराचा एक चांगला मार्ग गवसला आहे. अशा रेशीमनिर्मितीला या विभागात वाव असल्याने आणि त्यासाठी पूरक निसर्ग व वातावरण असल्याने ‘टसर (वन्य) रेशीम शाश्वत रोजगार प्रकल्प’ अंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याचा एक भाग म्हणून उचाटमध्ये टसर रेशीम अळी संगोपन व कोषनिर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. दुर्गम भागाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असून, स्थानिक भूमिपुत्रांच्या सहकार्यातूनच टसर रेशीम कोषनिर्मितीचा प्रयोग राबवला जात आहे.

आयन वृक्षाची पाने टसर अळीचे मुख्य खाद्य

z आयन वृक्षाची पाने हे टसर अळीचे प्रमुख खाद्य आहे. 1 डिसेंबरपासून शेतकऱयांनी त्या झाडांवर टसर अळी सोडली आहे. आता त्यापासून रेशीम कोष तयार व्हायला सुरुवात झाली आहे. रोजगार म्हणून असे कोणतेही शाश्वत साधन उपलब्ध नसल्यामुळे या विभागातील माणूस पोटापाण्यासाठी मुंबईकडे धाव घेतो. मात्र, आता त्याच्या हाताला काम आणि त्या कामाचा योग्य मोबदला या प्रकल्पाच्या माध्यमातून हाती येईल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे या विभागात उत्साहाचे वातावरण आहे.

टसर रेशीमसाठी उचाट गावाची निवड करण्यापूर्वी त्या परिसराचा अभ्यास करण्यात आला. टसर अळीचे खाद्य, तेथील पोषक वातावरण या गोष्टी ग्रामस्थांना पटवून दिल्या. त्यांची भूमिका विचारात घेऊन प्रत्यक्ष काम सुरु केले. टप्प्याटप्प्याने टसर रेशीमचे उत्पादन, त्यासाठी लागणारी बाजारपेठ याचे नियोजन केले जाणार आहे.

– डॉ. योगेश फोंडे, तज्ञ, टसर (वन्य) रेशीम प्रकल्प.