
उद्योगपतीचे घर फोडून 61 लाख रुपयांची रोकड व दागिने चोरून नेणाऱया एका ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रोकड व दागिने जप्त करण्यात आली आहेत. पुण्यात त्याला पोलिसांनी सिनेस्टाईलने अटक केली अूसन, पंधरा दिवसांपूर्वीच त्याने ही नोकरी सोडली होती.
उमाकांत बापू यादव (रा. सुलेट जवळगे, ता. अक्कलकोट) असे ड्रायव्हरचे नाव असून, आशिष पद्माकर पाटोदकर (रा. दक्षिण कसबा) यांनी फिर्याद दिली आहे.
पाटोदकर यांची दक्षिण कसबा येथील शनि मंदिरासमोर तीन मजली इमारत आहे. घटनेच्या दिवशी घर बंद करून ते कुटुंबीयांसह पुण्याला गेले होते. दुसऱया दिवशी पहाटे दीडच्या सुमारास ते घरी आल्यावर मुख्य दरवाजाचे गेट खुले असल्याचे दिसून आले; परंतु घरातील इतर दरवाजे मात्र बंद होते. त्यांना चोरीचा संशय आल्याने दुसऱया मजल्यावर ठेवलेली रोकड व दागिने डुप्लिकेट चावीने काढून चोरून नेल्याचे आढळले. यात 50 लाख 90 हजार 500 रुपयांची रोकड व 21 तोळे सोने चोरीस गेल्याचे निष्पन्न झाल्याने फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. तपासादरम्यान पंधरा दिवसांपूर्वी नोकरी सोडलेला उमाकांत यादव हा गायब असल्याची माहिती पुढे आली.
त्याचा मागोवा घेत असताना पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील एका लॉजवर थांबल्याची माहिती मिळाली. त्याच्यावर पाळत ठेवून सिनेस्टाईलने लॉजवरील रूमवर छापा घालण्यात आला. यावेळी यादवकडे चोरीतील 50 लाख 90 हजार 500 रुपये व 21 तोळे सोन्याचे दागिने असा 61 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल आढळला आहे