सात्त्विक-चिराग जोडीने रचला इतिहास, ठरली जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटनमध्ये पदक मिळवणारी हिंदुस्थानची पुरुष जोडी

जपानमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानच्या सात्त्विक साईराज आणि  चिराग शेट्टी जोडीने नवा इतिहास रचला आहे. या जोडीने आज उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या द्वितीय मानांकित ताकुरो होकी आणि  युगो कोबायाशी जोडीचा पराभव करीत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दिमाखात मजल मारली आणि स्पर्धेतील आपले पदक निश्चित केले. असा पराक्रम करणारी ही पहिली हिंदुस्थानी पुरुष जोडी ठरली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱया सात्त्विक-चिराग जोडीने आज अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत टॉप रँकिंग असलेल्या जपानी जोडीला पराभूत करण्याचा पराक्रम केला.

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सातवे रँकिंग असलेल्या सात्त्विक साईराज आणि  चिराग शेट्टी जोडीने जपानच्या दुसऱया रँकिंगप्राप्त ताकुरो होकी आणि  युगो कोबायाशी जोडीवर 24-22, 15-21, 21-14 अशी मात करीत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ही लढत 1 तास 15 मिनिटे चालली.

हिंदुस्थानसाठी दुहेरीतील दुसरे पदक

सात्त्विक-चिराग जोडीचे पदक जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील हिंदुस्थानसाठीचे दुसरे पदक ठरणार आहे. याआधी हिंदुस्थानच्या ज्वाला गुट्टा आणि  अश्विनी पोनप्पा या  जोडीने 2011 मध्ये महिला दुहेरीत देशासाठी पहिले पदक पटकावले होते. सात्त्विक-चिराग जोडीच्या विजयी अभियानाआधी हिंदुस्थानच्या एमआर अर्जुन आणि  ध्रुव कपिला जोडीची पुरुष दुहेरीतील विजयी दौड जागतिक स्पर्धेत तीनदा सुवर्ण पदक पटकावणाऱया मोहम्मद अहसान आणि  हेंड्रा सेतियावान या इंडोनेशियन जोडीने  रोखली. बिगरमानांकित अर्जुन-कपिला जोडीला अहसान-सेतियावान या अग्रमानांकित इंडोनेशियन जोडीने 21-8, 21-14 असे सहज पराभूत केले.