
बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानला मोठा विजय मिळाला आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिकाग शेट्टीच्या जोडीने स्विस ओपन सिरीज 300 टूर्नांमेंटमध्ये पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावले आहे. बासेलमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिरागने चीनच्या रेन जियांग यू आणि टान कियांग यांचा 54 मिनिटात 21-19,24-22 असा पराभव करत विजेतेपद पटाकावले आहे. स्विस ओपनमध्ये सात्विक चिरागचे हे पहिलेच विजेतेपद आहे. याआधी ऑक्टोबर 2022 मध्ये फ्रेंच ओपन सुपर 750 मधील विजयानंतर हा त्यांचा पहिलाच विजय आहे.
अंत्म सामन्यात सात्विक चिरागने दमदार सुरुवात करत सामन्यावर पकड घेतली होती. पहिला डाव त्यांनी 21-19 ने जिंकला. दुसऱ्या डावात चीनच्या खेळांडूनी सात्विक- चिरागसमोर आव्हान उभे केल्याने सामन्यात चुरस वाढली होती. मात्र, सात्विक चिरागने उत्तम खेळ करत विजेतेपद पटकावले.
सात्विक आणि चिरागने उपांत्य सामन्यात मलेशियाच्या ओंग यू सिन आणि टियो ई यी या जोडीची 21-19,17-21.21-17 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. नुकत्याच झालेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये सात्विक चिरागचा पहिल्याच फेरीत पराभव झाला होता. आता त्यांनी स्विस ओपनमध्ये विजेतेपद पटकावल्याने शानदार पर्दापण केले आहे.