सौदीने नाक दाबताच पाकिस्तानचा श्वास गुदमरला!

flag_of_pakistan

पंतप्रधान इम्रान खान व परराष्ट्र मंत्री शाह महेमूद कुरेशी यांच्या बाष्कळ बडबडीमुळे संतापलेल्या सौदी अरबने पाकिस्तानला यापुढे कोणतेही कर्ज न देण्याची तसेच पेट्रोल-डिझेलचा पुरवठा तत्काळ बंद करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. सौदीने नाक दाबताच पाकिस्तानचा श्वास गुदमरला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा हे तातडीने शिष्टाईसाठी सौदीला रवाना झाले आहेत.

इस्लामीक पेट्रोल उत्पादक राष्ट्रांची तातडीने बैठक बोलाकून त्यामध्ये कश्मीरच्या विषयावर चर्चा करण्यात यावी, असा आग्रह पाकिस्तानने धरला आहे. चीनच्या इशाऱयावरून ही मागणी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. मात्र सौदी अरबने ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर इम्रान खान यांनी सौदीवर टीका करण्याचा सपाटाच लावला. यामुळे संतप्त झालेल्या सौदी अरबने यापुढे पाकिस्तानला कोणतेही कर्ज देणार नाही व पेट्रोल-डिझेलचा पुरवठाही तत्काळ बंद करण्यात येईल, अशी घोषणा केली. सौदी अरबने पेट्रोल-डिझेलचा पुरवठा बंद केल्यास देशात हाहाकार उडेल, कारण इतर पेट्रोल उत्पादक राष्ट्रांनी पाकिस्तानकडे उधारी थकल्यामुळे पुरवठा घटवला आहे.

सौदी अरबने पेट्रोल-डिझेलचा पुरवठा थांबवताच पाकिस्तानचे सरकलेले टाळके ठिकाणाकर आले. लष्करप्रमुख कमर जावेद बाजावा यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेत तातडीने सौदीची वाट धरली. सौदीच्या राजांची भेट घेऊन ते सारवासारव करणार असल्याचे सांगण्यात आले.

कर्जाच्या उधारीवरून वाद
गेल्या वर्षी जूनमध्ये पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर होता. आयएमएफ व आशियन डेव्हलपमेंट बँकेने कर्ज देण्याची तयारी दाखवली. परंतु अत्यंत कडक अटीशर्ती घातल्या. त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी सौदी अरबसमोर झोळी पसरली. सौदीने 6.2 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले. यात 3 अब्ज डॉलर्स हे साधारण कर्ज होते. तर 3.2 अब्ज डॉलर्स पेट्रोल-डिझेलचे क्रेडिट होते. वर्षभरात पाकिस्तानला हे कर्ज चुकवायचे होते. पण एक छदामही पाकिस्तानला चुकवता आला नाही. उलट चीनकडून हातउसने घेऊन पाकिस्तानने कर्जाचा पहिला हप्ता फेडला. यावरूनच सौदी व पाकिस्तानमध्ये वादाची ठिणगी पडली आहे

आपली प्रतिक्रिया द्या