पासपोर्ट निर्जंतुकीकरणासाठी 800 रुपये शुल्क, सौदीला नोकरीसाठी जाणारे नागरीक वैतागले

सौदी अरेबियामध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना 800 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागतोय. प्रत्येक व्हिसा अर्जासाठीच्या प्रकियेसाठी एका पासपोर्टच्या  निर्जंतुकीकरणासाठी (Sanitisation) सौदी अरेबियाने 800 रुपयांचे शुल्क आकारायला सुरुवात केली आहे. सौदी अरेबियाने पासपोर्ट निर्जंतुकीकरणाचे काम एका त्रयस्थ कंपनीला दिले आहे. हा सौदीला नोकरीसाठी जाणाऱ्या गरीब लोकांना लुटण्याचा प्रकार असल्याचं सौदीमधील नोकरभरतीसाठी मदत करणाऱ्या दलालांचं म्हणणं आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांची रोजीरोटी हिरावली गेली आहे. सौदी अरेबियात जाऊन पैसा कमावून कुटुंब चालवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र तिथे जाण्यासाठी जो पैसा लागतो तो त्यांच्याकडे नसतो. दोन महिन्यांपूर्वी मोहम्मद नावाच्या एका सुताराने सौदीमध्ये नोकरी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तिथे नोकरी होती, मात्र व्हिसा, पासपोर्ट आणि निर्जंतुकीकरण शुल्क मिळून त्याला दीड लाख रुपये भरायचे होते. हे पैसे त्याच्याकडे नसल्याने मोहम्मदला या नोकरीवर पाणी सोडावं लागलं होतं. निर्जंतुकीकरण शुल्काबाबत अनेकांनी मुंबईतील सौदी दूतावासाकडे ईमेलद्वारे आणि फोनद्वारे तक्रारी केल्या होत्या मात्र या तक्रारींची दखल घेतली गेली नाही.