रिट्विट केल्याबद्दल 34 वर्षांचा तुरुंगवास, इंग्लंडमध्ये उच्चशिक्षण घेणाऱ्या महिलेला शिक्षा

सोशल मीडियाचा वापर करणं, त्यावर आपल्या भावना व्यक्त करणं एका महिलेला महागात पडलं आहे. ट्विटर वापरल्याबद्दल आणि रिट्विट केल्याबद्दल सलमा अल सहाब नावाच्या महिलेला 34 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सौदी अरेबियातील एका न्यायालयाने सलमाला ही शिक्षा सुनावली आहे. सलमा ही इंग्लंडमधल्या लीडस विद्यापीठातून पीएचडी करत असून ती दोन मुलांची आई आहे.

मूळची सौदी अरेबियाची रहिवासी असलेली सलमा सुट्ट्यांमध्ये तिच्या घरी आली होती. सौदी अरेबियात आल्यानंतर तिने काही असंतुष्ट व्यक्ती/संघटना यांना ट्विटरवर फॉलो केलं होतं. त्यांनी केलेली ट्विट सलमाने रिट्विट केली होती. सलमाने ज्या व्यक्तीना ट्विटरवर फॉलो केलं होतं त्यामध्ये लौजेन अल हथलौल हिचाही समावेश आहे. लौजेनने सौदी अरेबियात महिलांना कार चालवण्याचा अधिकार मिळावा यासाठी आवाज उठवला होता. लौजेनला ट्विटरवर फॉलो करत सलमाने तिचं समर्थन केलं आहे असा आरोप सलमावर करण्यात आला होता. याच आरोपाखाली सलमाला 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ट्विटरवर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या आणि तेढ निर्माण करणाऱ्या अफवा पसरवणाऱ्यांचे समर्थन केल्याप्रकरणी सलमावर अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा, देशद्रोह केल्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहचवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.